भाषणाचे प्रकार - Types of speech

भाषणाचे प्रकार - Types of speech


भाषणाचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतात.


अ) अनौपचारिक भाषण:


बोलण्याला हेतू, नियमबद्धता, शास्त्रशुद्धता नसणे, विषय, वेळ व स्थळांचे बंधन नसणे, मनाववर दडपण न आणता मनमोकळेपणे बोलणे म्हणजे अनौपचारिक भाषण होय. अनौपचारिक भाषणाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.


1) कौटुंबिक संवाद :


कुटुंबातील लहान मुलापासून ते वृद्धापर्यंतच्या सर्व बोलण्याचा समावेश यात असतो. घरगुती चर्चा, आज्ञा, सूचना, विनंती, विनोद इत्यादी कौटुंबिक संवादाचा यात समावेश असतो.


2 ) गप्पागोष्टी :


मित्रा-मित्रांमध्ये, समवयस्कांमध्ये गप्पागोष्टी होत असतात. गप्पागोष्टींना वेळेचे, विषयाचे तसेच स्थळाचे बंधन नसते. एकमेकांची खुशाली विचारणे, सुख दुःखे सांगणे, मनोविनोद करणे, आनंदाचे क्षण वाढविणे इत्यादींचा समावेश गप्पागोष्टी या प्रकारात होतो.


3) संदेशवहन :


आपले बोलणे कोणालाही कळू नये. ते बोलणे फक्त समवयस्क मित्रांना, गटांना त्यांचा अर्थ कळावा म्हणून विशिष्ट पद्धतीने बोलले जाते. उदा. गुप्तहेरांची भाषा, सांकेतिक भाषा इत्यादी. 


ब) औपचारिक भाषण:


शास्त्रशुद्ध, नियमबद्ध, रचनात्मक व सहेतूक भाषण म्हणजे औपचारिक भाषण होय. औपचारिक भाषणाचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतात.


1) वर्णन :


आपण अनुभवलेली एखादी व्यक्ती, वस्तू, प्रसंग, प्रवास, निसर्गइत्यादींचा अनुभव अप्रत्यक्षरित्या दुस-यांना देणे म्हणजे वर्णन होय. वर्णन हे सजीव, स्वाभाविक, हुबेहूब व प्रभावी असले पाहिजे,


2 ) निवेदन :


निवेदन म्हणजे जाणून घेऊन सांगणे. निवेदन वाचून दाखविता येते व सांगताही येते. निवेदन हे प्रमाणीत भाषेत असते. निवेदनात निवेदकाला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. घटनेचे अलिप्तपणे निवेदन केले जाते. उदा. रेडिओ, दूरदर्शनवरील बातम्या.


3. चर्चा:


एखादया विषयाचे निरनिराळे पैलू चर्चेद्वारे उलगडून दाखविले जातात. चर्चेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोलावेही लागते व ऐकावेही लागते. एकमेकांचे विचार समजून घेणे, नेमकेपणाने आपले विचार मांडणे इत्यादी बाबींचा चर्चेत समावेश होतो. चर्चा म्हणजे वादविवाद नव्हे तर चर्चेतून समस्या निराकरणाचे उत्तर मिळू शकते.


b. व्याख्यान :


सभेत, लहान-मोठ्या व्यक्तींच्या समूहाला उद्देशून केलेल्या भाषणास व्याख्यान म्हणतात. व्याख्यानातून वक्ता हा एकाच वेळी अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतो. व्याख्यान हे मनोरंजक, प्रभावी व परिणामकारक असले पाहिजे. व्याख्यान करणा-याला समोरच्या श्रोत्यांचे मानसशास्त्र जाणता आले पाहिजे.

ज्या विषयावर बोलायचे त्याची सखोल माहिती असली पाहिजे व तो विषय सोपा करून सांगता आला पाहिजे.


c. वादविवाद : या भाषण प्रकारात विषयाशी अनुकूल व प्रतिकुल असे दोन पक्ष भाग घेत असतात. कोणत्याही विषयाला दोन बाजू असतात. उदा. दूरदर्शन शाप की वरदान दोन्ही पक्ष आपआपल्या मतांचे समर्थन करतात.

त्यासाठी तर्कसंगत विचार, ते पटविण्यासाठी उदाहरणे व दाखल्यांचा वापर करतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या पक्षाचे मत खंडण करतात. 


d. कथाकथन :


सहज व हुबेहूब गोष्ट सांगणे म्हणजे कथाकथन होय. कथाकथन जिवंत वाटले पाहिजे. कथेतील घटना, पात्रे ऐकणाऱ्यासमोर स्पष्ट उभ्या राहिल्या पाहिजेत. कथाकथन करताना भाषेचा ओघ, आवाजात चढ उतार, स्वराघात, चेहऱ्यावर हावभाव इत्यादी गोष्टींना महत्त्व दयावे लागते.


e. स्पष्टीकरण :


व्याख्या, संज्ञा, संकल्पना, तत्त्वे, नियम, घटनेमागील कारणे इत्यादी अवघड भागांचे स्वरूप स्पष्ट करून दाखविणे म्हणजे स्पष्टीकरण होय. स्पष्टीकरणात सोप्या शब्दांचा वापर असतो, मुद्यांची क्रमवार मांडणी केलेली असते.


f. संवाद


नाटकातील संभाषणाला संवाद असे म्हणतात. पात्रांच्या या संवादातूनच नाटकाचे कथानक, पात्रांचे स्वभावचित्र स्पष्ट होते. या संवादाच्या उच्चारात स्पष्टता व शुद्धता, आवाजात चढ उतार, स्वराघात असला पाहिजे. या संवादफेकीतून नाटकातील भाव-भावना जिवंत झाल्या पाहिजेत. 


g. मुलाखत :


दोन व्यक्ती मुलाखतीत एकमेकांशी बोलत असतात. मुलाखत ही राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची घेतली जाते. त्याचप्रमाणे नोकरीसाठीही मुलाखत घेतली जाते. मुलाखतीतून त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी, एखादया विषयांसंबंधीचे विचार-मत, त्याच्यातील आत्मविश्वास इत्यादी बाबी समजतात. मुलाखत घेणाऱ्यांच्या अंगी सुद्धा 'मुलाखत घेणे' हे भाषण कौशल्य असावे लागते.