भाषा शिक्षणाची तत्त्वे पुढीलप्रमाणे(2) - The principles of language learning are as follows

भाषा शिक्षणाची तत्त्वे पुढीलप्रमाणे (2)- The principles of language learning are as follows

 1. प्रारंभिक अवस्थेचे तत्त्व :


मुलाला भाषा बोलता आल्याशिवाय भाषा अध्ययनाला प्रारंभ करता येत नाही. ते मूल जरी घरात मातृभाषा बोलत असले तर ऐकणे, बोलणे, प्रत्युत्तर करणे (श्रवण, भाषण, संभाषण) इतपत त्याची प्रगती झालेली असते. मूल जी भाषा घरात बोलते, त्यावर घरातील बोलीभाषा व परिसराचे संस्कार होतात. त्यामुळे न /ण चा गोंधळ, जोडाक्षरांच्या उच्चारातील कमतरता, सदोष वाक्यरचना असे दोष कधी-कधी आढळतात. त्यामुळे वय वर्ष 6 ते 10 च्या दरम्यान शाळेत मुलाच्या भाषा अध्ययनास सुरूवात होणे इष्ट. कारण याच वयात मुलांची वागूइंद्रिये कार्यक्षम होतात. कान, ओठ, जीभ, घशाची पोकळी, स्वरयंत्र ही इंद्रिये त्याला बोलण्यासाठी. उच्चारासाठी मदत करतात. त्यांचा विकास या वयात झाल्याने प्रारंभिक अवस्था महत्त्वाची ठरते. या वयात ही वागूइंद्रिये अधिक संस्कारक्षम व लवचिक असतात. त्यामुळे वय वर्षे 4 ते 6 च्या दरम्यान मूल बालणे, ऐकणे ही मूलभूत कौशल्ये, दैनंदिन जीवनास आवश्यक अशी शब्दसंपत्ती, भाषेची रचना, वैशिष्टये व त्यांचे नियम आत्मसात करू शकते. त्यामुळे 6 ते 10 वर्षांपर्यंत शाळेत शुद्ध उच्चारांची सवय लावणे, अक्षराला वळण लावणे, बोलण्याच्या योग्य पद्धतींचा सराव देणे, पाठांतराची सवय लावणेइत्यादी गोष्टी प्रारंभिक अवस्थेत सहज शक्य होतात. त्यामुळे भाषा शिक्षणाचा प्रारंभिक काळ महत्त्वाचा मानला जातो.


2. पक्वतेचे तत्त्व :


भाषा शिकणे हे एक कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल शिकण्यासाठी शारीरिक व मानसिक किमान पक्वतेची गरज असते. बाळाने खूप लवकर बोलावे असे आईला वाटत असले तरी ठरावीक काळानेच ते बोबडे बोल बोलू लागते. त्यासाठी घाई करून उपयोग नसतो. मुलाची इंद्रिये जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत उच्चार, वाचन, लेखन ही कौशल्ये शिकवून उपयोग नसतो. जशी शारीरिक पक्वता तशीच मानसिक पक्वताही महत्त्वाची. विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून त्यांना नवे शब्द शिकवावे लागतात. इयत्ता तिसरीत विघार्थ्यांना गीतेतील शब्द समजावयाचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडचे असतील. म्हणजेच शब्दसंपत्ती वाढविणे, रसग्रहण क्षमता निर्माण करणे, वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणे यासाठी योग्य मानसिक पक्वता आवश्यक असते. बुध्दिमत्तेत मागास असनाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपेक्षित भाषिक क्षमता गाठताना त्रास होतो. म्हणून विद्यार्थ्यांना भाषा शिकविताना त्यांची आकलन क्षमता, बौध्दिक क्षमता, शारीरिक व मानसिक क्षमतांचा, त्यांच्या पक्वतेचा विचार करावाच लागतो.


3. स्वाभाविकता, अनुकरण व स्वयंसंशोधनाचे तत्त्व : 


भाषा शिकण्याची शक्ती प्रत्येकात नैसर्गिकरीत्या असते. मूल सहजपणे भाषा शिकते व ऐकून बोलून त्याचा भाषिक विकास होतो. ऐकणे, ऐकलेले समजण्याची कला त्याला आपोआप येते. बोलण्याची कला आपल्याला निसर्गाने दिली नसती तर भाषेच्या अमोल शक्तीपासून आपण वंचित राहिलो असतो. ही शक्ती मातृभाषेपुरतीच न राहता अन्य भाषेच्या संपर्कात मूल आले तर ती भाषाही ते सहज स्वाभाविकपणे शिकते. मुलांमध्ये भाषा शिकण्याची स्वयंस्फूर्त योग्यता असते. प्रौढ व्यक्तींमध्ये ही शक्ती कमी-कमी होत जाते. भाषा शिक्षणात अनुकरणाचे महत्त्वही विशेष आहे. बालक अतिशय अनुकरणशील असते; बालकच नव्हे तर किशोरांमध्येही अनुकरणाची प्रवृत्ती दिसते. पुढे ही प्रवृत्ती कमी-कमी होत जाते. शब्दांचे उच्चार, वाक्यरचना, त्यांचा उपयोग मूल अनुकरणाने शिकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुकरणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा आदर्श असावा आणि म्हणूनच शिक्षकाने भाषेचा उपयोग, वापर योग्य प्रकारेच केला पाहिजे..


4. प्रयत्नांचे तत्त्व


भाषा गुंतागुंतीचा व सूक्ष्म विषय आहे. त्यामुळे भाषा शिकताना नैसर्गिक शक्तीबरोबरच प्रयत्नांचीही गरज असते. वाढत्या वयाबरोबरच विद्यार्थ्यांना भाषेतील साहित्य प्रकारांचा अभ्यास करावा लागतो. अलंकारिक व कलात्मक भाषा त्यांना प्रयत्नामुळेच शिकता येते. श्रुतलेखन, वाक्यरचना, तालासुरात पाठांतर, अनुवाद यासाठी प्रयत्न व सरावाची आवश्यकता असते. शुद्ध भाषेसाठीही प्रयत्नांची गरज असतेच.


5. स्वयंअध्ययनाचे तत्त्व :


भाषा शिकताना बालक स्वतः आपल्या चुका दुरुस्त करीत असते. बोलताना मूल जर इकडे ऐवजी इकले म्हणत असेल, 'ड' ऐवजी 'ल' अक्षराचा वापर करीत असेल आणि इतर त्याला चिडवत असतील तर ती चूक मूल दुरुस्त करते. शब्द, वाक्य, त्यांचे उच्चार, त्यातील तृटी मूल स्वतः दुरुस्त करीत भाषा शिकते.

स्वयंसंशोधन पद्धतीचा वापर शिक्षकांनी करून घेतला पाहिजे. विशेषतः विद्यार्थ्यांचे उच्चारणातले दोष त्याला योग्य शब्दात दाखवून दिले, त्याच्या अहंला न दुखावता चुका सांगितल्या तर स्वयंसंशोधनाच्या तत्त्वानुसार पच्चीम' चे पश्चिम', 'आनी' चे 'आणि' हे उच्चार तो दुरुस्त करील.


6. आधी मौखिक कौशल्ये, नंतर लेखन कौशल्याचे तत्त्व :


मूल आधी बोलायला शिकते म्हणून भाषा अध्यापनात आधी तोंडी (मौखिक) कौशल्ये शिकवावीत. मौखिक कार्यानंतर लेखन शिकवावे. वर्णमाला लिहिण्यास शिकविण्याआधी वर्णमाला वाचन शिकविले पाहिजे. मादामा मॉटेसरींचा या तत्त्वाला विरोध होता. परंतु भाषेचे स्वरूप बघता मौखिक कार्य आधी, नंतर लेखन हा क्रम निश्चितपणे सांगता येतो.


7. स्वातंत्र्याचे तत्त्व :


विद्यार्थ्यांने भाषेवर प्रभुत्व मिळवावे, असे शिक्षकांना वाटत असते. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाषा बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. परंतु स्वतंत्रपणे भाषा वापरीत असताना त्यांनी काही चुका केल्या तर त्या न रागावता दुरुस्तही केल्या पाहिजेत. उदा. एल. एम. या इंग्रजी वर्णांचा उच्चार यल, यम, असा केला तर त्या विद्यार्थ्यांना न हसता चूक समजावून द्यावी. अन्यथा न्यूनगंडामुळे तो ती भाषा बोलणेच सोडून देईल. मराठी शिकवितानाही आपण अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो. त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी तशी देऊ देत, नंतर सुधारणा करणे शक्य आहे. बोलण्यासाठी लिहिण्यासाठी स्वतंत्र वातावरणाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणे, त्या अनुरोधाने त्याने विचार करणे, प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. उदा. शहरातल्या शाळेत पाऊलवाटा' हा लघुनिबंध शिकवायचा असेल तर तुम्ही रोज शाळेत डांबरी रस्त्याने जाता, हे रस्ते आखून तयार केले जातात, पण काही रस्ते आपोआप होतात, कोणते यासारखी उत्सुकतापूर्ण पार्श्वभूमी तयार केल्यास विद्यार्थी स्वतः विचार करतो,

वाक्याची जुळणी करून उत्तरे देतो. विचार भावना प्रकट करतो. परंतु वर्गांतील वातावरण मोकळे नसेल तर विद्यार्थ्यांच्या आत्मप्रकटीकरणात अडथळे येतात. यासाठी वादविवाद, संभाषण, चर्चा, पत्रव्यवहार यातून विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे आपली मते मांडण्याची संधी दिली पाहिजे. निबंधाचेही मुद्दे त्यांच्यावर न लादता एखादा विद्यार्थी स्वतंत्रपणे लेखन करू शकत असेल तर त्याच्या अभिव्यक्तीला वाव दिला पाहिजे. स्वातंत्र्याचे तत्त्व भाषा अध्यापनात विद्यार्थ्याला नवनिर्मितीकडे घेऊन जाते.


8. व्यक्तिभिन्नतेचे तत्त्व


एक व्यक्ति बौध्दिक क्षमता, आवड, वृत्ती, प्रवृत्ती, शारीरिक क्षमता, भावनिक उत्तेजन याबाबत दुसऱ्या व्यक्तीइतकी तंतोतंत सारखी नसते. हे मानसशास्त्राचे तत्त्व शिक्षणशास्त्रातही मान्यता पावले आहे. परंतु वर्ग अध्यापनात सर्वच विद्यार्थी वरील सर्व बाबतीत सारखेच आहेत,

असे धरून अध्यापन चालते. भाषा शिकणे हे एक कौशल्य आहे आणि कौशल्य प्राप्त करणे हे ज्याच्या त्याच्या मगदुरावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिभेदाचे तत्त्व लक्षात घेऊन शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भाषिक त्रुटी व्यक्तिगत स्तरावर समजावून घेतल्या पाहिजेत व त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यात काही शारीरिक व्यंग उदा. तोतरे बोलणे, कमी ऐकू येणे असेल तर त्यावरही उपचार करणे गरजेचे असते. थोडक्यात, भाषा अध्यापनात व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज भासते.


9. बाल केंद्रिततेचे तत्त्व :


आजची शिक्षणपद्धती बालकेंद्रित आहे. बालकासाठी शिक्षण आहे. त्यामुळे भाषिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी बालकाला सक्षम बनविणे हे भाषा शिक्षकाचे उद्दिष्ट असले पाहिजे. कधी कधी वर्गात भाषा शिकविताना शिक्षक आनंदविभोर होतात, परंतु आपल्या अध्यापनातून तोच आनंदाचा ठेवा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो की नाही याची शिक्षकांना फारशी चिंता नसते. खरे तर विद्यार्थ्यांनाही त्या पाठातून तितकाच आनंद मिळणे गरजेचे आहे.

त्यामुळे भाषा अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे द्यायला हवीत, भाषा शिकविताना विद्यार्थ्यांचे स्वभाव, त्यांचा परिसर, त्यांची बौध्दिक कुवत, त्यांची आवड लक्षात घ्यावी लागते. उदा. छोटया गटाचे शब्दभांडार वाढवायचे असेल तर त्याचे शरीर, घरातील मंडळी, त्यांची नाती, आवडते पशुपक्षी, शेजारी, त्यांचे गाव यासंबंधी शब्दावलीची भर पाडण्यास शिक्षकाने मदत केली पाहिजे.


10. क्रियाशीलतेचे तत्त्व :


भाषा अध्ययनात जर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले तर ते सक्रिय राहतात व भाषा चटकन शिकतात. परंतु त्यांना निष्क्रिय केले, फक्त श्रवण भक्ती करायला सांगितली तर बालक भाषा शिकत नाही. शिक्षक सक्रिय असून भागत नाही. बालकानेही भाषेचा वापर, उपयोग, प्रयोग वर्गात केला पाहिजे.

म्हणून तर प्रश्नोत्तर पद्धतीचा वापर भाषा अभ्यापनात केला जातो. प्रश्नांची उत्तरे देताना, व्यक्तीचे वर्णन करताना, स्वतःच्या शब्दात म्हणी, वाक्यप्रचारांचा उपयोग करताना विद्यार्थी सक्रिय होतो. विचार करतो, भाषेचा स्वतःच्या मर्जीनुसार प्रयोग करतो व भाषेचा वापर योग्य प्रकारे करतो. फक्त प्रश्नोत्तर पद्धतीचाच वापर न करता, शिक्षकाने वर्गात नाट्यीकरण पद्धती, चर्चा पद्धती, वादविवाद इत्यादी पद्धतींचा वापर केला तर विद्यार्थी क्रियाशील होतील व अध्यापनात अधिक रुची घेतील.


11. पुनरावृत्तीचे तत्त्व :


प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे' या उक्तीने थॉर्नडाईकचा पुनरावृत्तीचा (सरावाचा) नियम स्पष्ट होतो. भाषा एक कौशल्य आहे आणि जितके प्रयत्न अधिक, सराव जास्त, तितका भाषिक विकास जास्त, सराव नसेल तर भाषेवरील प्रभुत्व कमी होते. बरेच मराठी भाषिक लोक बंगाली, गुजराती, फ्रेंच, रशियन, उडिया, तेलगू या भाषा प्रयत्नपूर्वक शिकतात. पण पुढे त्याचा सराव न राहिल्याने त्या भाषा बोलणे, वाचणे,

लिहिणे त्यांना जमत नाही. भाषा अध्यापनात भाषासामग्री कंठस्थ (पाठ) करण्याचे महत्त्व यासाठीच आहे. त्यामुळे भाषा बोलताना वाटणारी लाज, संकोच, अशुद्धतेची भीती दूर होते. म्हणून काही जोडाक्षरे, म्हणी, वाक्यप्रचार, संवाद, कविता विद्यार्थ्यांकडून पाठ करवून घेतल्या पाहिजेत. सततच्या सरावाने, पुनरावृत्तीने पाठांतर सोपे होते व पाठ केलेल्या म्हणी, वाक्प्रचारांचा लेखन, भाषणात सहज उपयोगही करता येतो. महर्षी पतंजलींनी भाषा अभ्यासाच्या संदर्भात तीन आवश्यक बाबी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे रुची, नैरंतर्य व वैराग्य होय. निरंतर म्हणजे सतत अभ्यास (प्रयत्न) करणे, अभ्यासात रुची निर्माण करणे, आवड असणे गरजेचे आहे. अभ्यासातील बाधक तत्त्वांबाबत वैराग्य भाव ठेवावा. म्हणजे बाधक तत्त्वे दूर करावीत. तृटी कमी कराव्यात. अशा प्रकारे केलेला सराव अंतिम लक्ष्याप्रत जातो. खेळाच्या संदर्भातही फुटबॉल, हॉकी या खेळातही सामान्य खेळाडू आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करू शकतो. त्यामुळे कोणतेही कौशल्य शिकण्यासाठी सरावाचे, पुनरावृत्तीचे तत्त्व महत्त्वाचे ठरते.


12. बहुमुखी (अनेकांच्या) प्रयत्नांचे तत्त्व :


भाषा शिक्षणासाठी एकटया भाषा शिक्षकाने प्रयत्न करून भागत नाही. इतर विषयांच्या शिक्षकांनीही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. कारण एका तासिकेत भाषा शिक्षकाने शुद्ध उच्चारणासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर इतिहास, भूगोलसारख्या विषयात विद्यार्थी पच्चीम, हाये, आनी म्हणत राहिला व शिक्षकांनी त्या अशुद्धतेकडे किंवा लिखाणातील चुकांकडे दुर्लक्ष केले तर विद्यार्थी भाषेचा उपयोग योग्य प्रकारे करू शकणार नाही. उलट तो काही बाबतीत गोंधळात पडेल. जे शब्द इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रात चुकत नाहीत ते भाषेतच कसे चुकतात असा प्रश्न त्याला सतावत राहील. त्यामुळे भाषेच्या तासाला शुद्धतेवर भर व उरलेल्या सात तासांत तिकडे दुर्लक्ष असे करून चालणार नाही. त्यासाठी सर्व शिक्षकांनी सांघिक प्रयत्न करणे गरजेचे ठरते. इतकेच नव्हे तर पाठयक्रमाव्यतिरिक्त सहशालेय कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, अनौपचारिक गप्पा यातही सर्व शिक्षकांनी शुद्ध उच्चारण स्वतःचे' व विद्यार्थ्यांचे इकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा भाषिक विकास योग्य प्रकारे होईल.


13. उपयोजनाचे तत्त्व :


उपयोजन म्हणजे मिळविलेले ज्ञान व्यवहारात उपयोगात आणता येणे, त्या ज्ञानाचा वापर करता येणे, विद्यार्थी बेरीज-वजाबाकी शिकला की त्याला तोंडी हिशेब यावेत हे गणितातले उपयोजन होय. तो विद्यार्थी 14 रूपये घेऊन भाजी आणायला गेला तर किती पैसे झाले हे त्याला तोंडी हिशेबाने समजावे, त्यासाठी पेन-पेन्सिलीचा वापर न करता यावा. याच प्रकारे भाषेतही शिकलेली कौशल्ये उपयोजित करता आली पाहिजेत. विद्यार्थ्याला चिन्हांचा वापर करून प्रगट वाचन करता आले पाहिजे. कवितेचे सुस्वर गायन करता आले पाहिजे. थोडक्यात, शिक्षकांनी जो पाठ शिकविला असेल त्याला अनुसरून उपयोजन घेतले तर विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाबरोबर त्यांचा वाड्.मयीन विकासही होईल.