वार्षिक नियोजन - annual planning

वार्षिक नियोजन - annual planning


इयत्तानिहाय निर्धारित अभ्यासक्रमाचे योग्य घटकात उपलब्ध तासिकात विभागणी करून वर्षभरात विषयाचे समग्र नियोजन करावे लागते. अभ्यासक्रम, अध्ययन अनुभव, अध्यापन पद्धती, उद्दिष्ट्ये या सर्वांचा विचार करून आपणास वर्षभराचे नियोजन करावे लागते. निर्धारित उद्दिष्टाच्या पूर्ततेकरिता अभ्यासक्रमाचे पूर्वनियोजन करावे लागते. विखुरलेल्या पाठ्य घटकाचे सलग अध्यापन उद्दिष्ट प्राप्ती करिता सहायक ठरण्याकरिता अशा सलग घटकाची मांडणी करून अभ्यासक्रमाचे नियोजन करावे लागते. वर्षभरातील उपलब्ध तासिका, उपलब्ध वेळेनुसार पाठ्य घटकाचे नियोजन करावे लागते. वार्षिक नियोजन करतांना अभ्यासक्रमाचे घटकात विभागणी करावी लागते. याकरिता शिक्षकाला घटक निकषाचे ज्ञान असावयास हवे. घटकाचा एकजिनसीपणा, विविध कृती, अनुभूती व पाठ्यांश याची सुसूत्र गुंफण, विद्यार्थ्यांमध्ये योग्य बदल घडून आणण्याची क्षमता इ. निकषाधिष्ठित घटकाचे नियोजन अभ्यासक्रमातून शिक्षकाने करावे. मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकात गद्य, पद्य, स्फुटलेखन, वैचारिक लेख, व्याकरण इत्यादीचा समावेश असतो.

या विविधांगी पाठ्यक्रमाचे एकजिनसी घटकात विभागणी करण्यात भाषा शिक्षकाचे कौशल्य पणास लागते. मातृभाषा अभ्यासक्रमाची घटक विभागणी करणे इतर विषयाच्या तुलनेत कठीण असते. मातृभाषेच्या अध्यापनातून भाषिक उद्दिष्ट्ये (श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण), वाड:मयीन उद्दिष्टये, क्षमता विकास ( अभिव्यक्ती, कल्पना शक्ती, सृजनशीलता, रसग्रहण), मूल्ये संवर्धन इत्यादी उद्दिष्ट्ये अभ्यासक्रम व अभ्यासक्रम सह कार्यक्रम यांच्या सहकार्याने पूर्ण करावयाचे असते. वर्ग अध्यापनासोबतच विविध उपक्रमाच्या सहाय्याने उद्दिष्टाची पूर्तता करावी लागते.


पाठ्य पुस्तकातील पाठाचे एकजिनसी घटकात नियोजन न करता प्रत्येक पाठ स्वतंत्रपणे शिकविल्यास उद्दिष्टाची पूर्तता करणे अवघड जाईल. पाठातील अंतर्गत सुसंगती लक्षात येणार नाही. साहित्य व साहित्यीकाच्या शैलीचे सम्यक दर्शन होणार नाही. पाठातील विचारांत सलगता, एकसंघपणा राहणार नाही.

म्हणून एकसंगती व सुसंगती प्रस्थापित करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील पाठात समान सूत्र, समान मूल्य शोधणे अत्यंत आवश्यक आहे. समान सूत्रावर वा मूल्यांवर आधारित घटकाची मांडणी करणे महत्त्वाचे आहे. याचा संकलित सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या क्षमता व मूल्य विकासावर होईल.


अध्यापन करतांना एका घटकाचे सलग अध्यापन होणे अपेक्षित आहे. एका घटकांतर्गत सर्व पाठाचे अध्यापन सलग व्हावे. त्याकरिता एकजिनसी पाठाचे घटक नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. पाठ्यक्रम तयार करतांना घटक नियोजनाचा विचार व्हावा. वार्षिक नियोजन करतांना घटक तयार करण्यास विशेष महत्त्व आहे. घटक हा वार्षिक नियोजनाचा मूलाधार आहे. ललित निबंध, लघुकथा, प्रवास वर्णन, वैचारिक निबंध, आत्मकथन,

नाट्यप्रवेश यामध्ये घटकाचे नियोजन करता येईल. काव्याच्या बाबतीत निसर्ग वर्णनात्मक कविता, संत कविता, आधुनिक कविता, भाव कविता, चिंतनात्मक कविता, दलित कविता अशा स्वरूपात कवितांचे घटक नियोजन करता येते. यानुसार घटक नियोजन केल्यास सुसंगती निर्माण करता येते.


वैज्ञानिक अभिवृत्ती, राष्ट्रीय वृत्ती, सामाजिक जाणीव, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी मूल्यांची रुजवणूक करणाऱ्या पाठानुसार घटक नियोजन करता येईल. घटकातील पाठ, उपलब्ध तासिकांची संख्या, उद्दिष्टांची निश्चिती व पूर्तता, घटक चाचणीद्वारे मूल्यमापन इत्यादिचा विचार वार्षिक नियोजनात करावा लागतो. शाळेचे कार्यदिवस, सहशालेय उपक्रम (क्रीडा महोत्सव, सत्र परीक्षा, स्नेह संमेलन, इ.), रविवार व इतर सार्वजनिक सुट्या विचारात घेवून अध्यापनाचे नियोजन करावे लागते. मराठी भाषेच्या अध्यापनाकरिता दिवसाच्या तासिका, आठवड्याच्या तासिका, महिन्याच्या तासिका, वर्षाच्या तासिका व अभ्यासक्रम याचे नियोजन करावे लागते. वर्षभराच्या अद्यापनाचे नियोजन करून वर्षाच्या शेवटी उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या परीक्षणाकरिता मूल्यमापन करावे लागते. उद्दिष्ट्ये व उपघटकानुसार वार्षिक नियोजन करता येते.