बुद्धीमंथन तंत्र - Brainstorming

बुद्धीमंथन तंत्र - Brainstorming


इ. स. 1957 मध्ये बुद्धीमंथन तंत्राचा वापर करण्याबाबत आर्स बर्न यांनी सुचविले. बुद्धीमंथन तंत्राचा उपयोग विविध अडचणी व समस्यावर उपाय शोधण्यासाठी करता येतो. व्यक्तीचे विचार, संकल्पना इत्यादींची अभिव्यक्ती करण्याची संधी बुद्धीमंथन तंत्राच्या सहायाने प्राप्त होते. इतरांचे विचार- कल्पना समजून घेणे, सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध बुद्धीमंथन तंत्रामध्ये प्राप्त होते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनक्षमता, कल्पनाक्षमता, विचारशक्ती, तर्कशक्ती, सर्जनशीलता इत्यादीच्या विकासास वाव असतो.


बुदधीमंथनाचा अर्थ :


शिक्षण क्षेत्रातील समस्या वैयक्तिक असो की सामुहिक स्वरूपाच्या असो या समस्यांच्या निराकरणाकरिता जेंव्हा अनेकांनी विचार करणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. तेंव्हा वापरण्यात येणाऱ्या तंत्राला बुद्धीमंथन तंत्र म्हणतात.”


बुद्धीमंथन तंत्र


सामुहिक बुद्धी किंवा सामुहिक विचार वैयक्तिक बुद्धी व विचारापेक्षा महत्वाचा असतो. सामुहिक मंथनातून विविधांगी विचार विमर्श होवून विविध उपाय समोर येतात. समस्या निराकरणाची हे उत्तम तंत्र होय. ही विचार मंथनाची प्राचीन पद्धती असून खऱ्या अर्थाने ती बुद्धी परीक्षा होय. शब्दार्थ, वाक्यप्रचार, गद्य-पद्य यातील बारकावे, निबंधाची रचना इ. करीता उपयुक्त ठरते. बुद्धीमंथनात विद्यार्थ्यासमोर उपस्थित केलेल्या समस्येवर विविध अंगाने विद्यार्थी विचार करतात. या समस्येच्या संदर्भातील प्रश्नांचे निरसन केले जाते. अर्थातच एखाद्या समस्येची कारणे, अडचणी, उपाय इत्यादीवर सांगोपांग विचार बुद्धीमंथनात केला जातो. बुध्दीमंथन यशस्वी करण्याकरिता शिक्षकाची जबाबदारी महत्वाची आहे. विद्यार्थी प्रतिसाद, सहभाग, विचार प्रदर्शन, नेतृत्व क्षमता इत्यादी नोंदी शिक्षकाला नोंद पत्रिकेत करावयाच्या असतात. विद्यार्थ्यांसमोर समस्या मांडणे, उपाय सुचविण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, उपायांची यादी व प्रतवारी करणे, फेरविचार करणे, उपायांची विद्यार्थ्यांच्या सहाय्याने निश्चिती करणे इ. कार्यात शिक्षकाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा.