मराठीचा इतर विषयांशी सहसंबंध - Correlation of Marathi with other subjects

मराठीचा इतर विषयांशी सहसंबंध - Correlation of Marathi with other subjects


शाळा आणि महाविद्यालयात आपण जे विविध विषय शिकवितो त्यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असतो. वास्तविक पाहता ही एकाच जीवनाची अंगोपांगे आहेत. सर्व विषयांच्या अभ्यासातून संपूर्ण जीवन साकार होत असते. अभ्यास करण्याच्या दृष्टीने आपण आपल्या सोईसाठी असे वेगवेगळे भाग केले आहेत व त्यांना इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणितशास्त्र, मराठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र इत्यादी नावे दिली आहेत. त्यामुळे वर्गाध्यापनाच्या वेळी एखादा विषय महत्त्वाचा, दुसरा विषय गौण किंवा एक विषय श्रेष्ठ, दुसरा कनिष्ठ असे काहीही असत नाही. सर्व विषय आपापल्या परीने महत्त्वाचे आहेत. जीवनाचे दर्शन एका विशिष्ट अंगाने समजून सांगणारे आहेत.


शालेय किंवा उच्च माध्यमिक शाळेत सर्वच विषय आपणास तुटकपणे शिकवायचे नाहीत तर त्यातील सहसंबंध किती घनिष्ठ आहे, सर्वच विषय कसे एकमेकांना जोडलेले आहेत हे वेळोवेळी दाखवून द्यावयाचे आहे.

प्रत्येक विषयात शिकविणारे शिक्षक वेगवेगळे असल्यामुळे विषयांत असलेला परस्परसंबंध चटकन ध्यानात येत नाही. त्यामुळे एकूण जीवन जाणण्यातच तुटकपणा निर्माण होतो. हा तुटकपणा कमी करून त्यांच्यातील संबंध विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून देण्याचे महत्त्वाचं कार्य शिक्षकांना करावयाचे आहे. एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी जसा जवळचा संबंध आहे तसाच प्रत्येक विषयाचा जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी तसाच प्रत्येक विषयाचा जीवनाशी संबंध जेव्हा आपण जोडत असतो तेव्हा त्याला समवाय असे म्हणतात. एकदा आपण हा समवाय प्रस्थापित केला की मग एका विषयात संपादित केलेली कौशल्ये दुसऱ्या विषयातही उत्तम प्रकारे उपयोगी पडतात हे ध्यानात येते. हे सहसंबंध दोन प्रकारचे असतात. एक तर विषयात अंतर्गत सहसंबंध असतात आणि दुसरे असे की एका विषयाचा इतर विषयांशी सहसंबंध असतो. मातृभाषा मराठी या विषयाच्या संदर्भात हे अंतर्गत सहसंबंध कसे आहेत व अन्य विषयांशीही मातृभाषेचे सहसंबंध कसे आहेत हे आपणास आता विस्ताराने पाहावयाचे आहे.


विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेला प्रादेशिक भाषा असे म्हणतात. त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये त्या त्या भाषेतून व्यक्त होत असतात. प्रादेशिक भाषेतून साहित्यनिर्मिती होत असते. त्या प्रदेशातील वास्तवतेच्या चित्रणाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. प्रादेशिक भागात लोक जशी भाषा बोलतात तसेच लिहिलेले असल्यामुळे प्रादेशिक भाषेतील उतारे विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडतात. अशा उताऱ्यातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात. प्रादेशिक भाषेतील पाठ पाठयपुस्तकात समाविष्ट करावेत. वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, खानदेशी तसेच कोकणी भाषेतील पाठ काही प्रमाणात पाठयपुस्तकांत समाविष्ट केले आहेत. प्रमाणभाषेतील पाठ आणि प्रादेशिक भाषेतील पाठ यांत वापरल्या गेलेल्या भाषेत बरेच साम्य असते. काही विशिष्ट शब्दांतील तसेच वाक्यरचनेतील फरक लक्षात घेतले की ते पाठ लगेच समजतात.


प्रादेशिक भाषेच्या श्रेष्ठत्वावरून एखादया वेळी वाद निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रमाणभाषाच कशाला हवी आम्ही वन्हाडी भाषेतच बोलू असा तंटा निर्माण झाल्याने राष्ट्रीय ऐक्याला तडा जाण्याचा धोका असतो. पण त्या भाषांत असलेला सहसंबंध ध्यानात आणून दिल्यास त्यातून भावनिक ऐक्य साधता येते. दर दोन कोसांवर भाषा बदलत असते. भाषा मराठीच पण त्यात थोडा-थोडा फरक होत जातो. या पूर्वीच्या पाठयपुस्तकातील बहिणाबाईंच्या कविता, लक्ष्मण माने यांचा शाळंत जायचं' हा पाठ, विठ्ठल वाघांची 'तिफन' ही कविता भाषेतील वेगळेपण असूनही विद्यार्थिप्रिय असलेल्या दिसून येतात.


विविधता आहे पण त्यातून एकता प्रस्थापित करणे ही शिक्षकांची भूमिका असली पाहिजे. प्रादेशिक भाषा, बोलीभाषा, प्रमाणभाषा, पोटभाषा यांवरून भांडत न बसता त्यांत असलेल्या सहसंबंध प्रस्थापित करणे अगत्याचे असते. त्यामुळे त्यांच्यामधील असलेल्या वेगळेपणाचा आस्वाद विद्यार्थी घेऊ शकतील.