परीक्षा पद्धती , परीक्षा पद्धतीचे प्रकार - Examination methods, types of examination methods
परीक्षा पद्धती , परीक्षा पद्धतीचे प्रकार - Examination methods, types of examination methods
परीक्षा पद्धतीचे प्रकार :
परीक्षेचे लेखी, मौखिक व प्रात्यक्षिक असे प्रकार आहेत.
लेखी परीक्षा :
लेखी परीक्षेला विशेष महत्त्व दिले जात असून विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याची तपासणी करण्यावर भर असतो. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात. लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचे परीक्षण केले जाते. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैचारिक ज्ञान, भाषा कौशल्य, हस्ताक्षर इत्यादी कौशल्याचे मूल्यमापन केले जाते.
तोंडी परीक्षा :
लेखी प्रगटीकरणा इतकेच मौखिक व तोंडी प्रगटीकरणालाही भाषेच्या परीक्षेत महत्त्वाचे स्थान आहे. भाषा उच्चार, काव्य गायन व काव्यवाचन, नाट्यवाचन, वक्तृत्व इ. कौशल्याचे परीक्षण करावे. कौशल्यातील चुकांचे निदानही करता येते. भाषेच्या दैनंदिन अध्यापनात कौशल्य प्राप्तीच्या प्रगतीचा अंदाज घेता येतो. प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्यमापनाकरिता स्वतंत्र वेळ द्यावा लागत असल्याने मूल्यमापनाकरिता अधिक वेळ लागतो. निरपेक्ष मूल्यमापनाकरिता नोंदी ठेवणे आवश्यक आहे. भाषाउच्चार, भाषण शैली, काव्य गायन व काव्यवाचन, नाट्यवाचन, वक्तृत्व इ. कौशल्याचे परीक्षण करण्याकरिता उपयुक्त आहे. विद्यार्थ्याच्या चुकांचे निदान करता येते. दैनदिन अध्यापनात विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज घेता येतो. परंतु तोंडी परीक्षा पद्धती वेळखाऊ आहे. ज्ञानाचे व कौशल्याचे सर्वांगीण मापन करता येत नाही. सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे प्रश्न विचारणे कठीण कार्य आहे. उत्तराची नोंद नसल्यामुळे प्रश्न पृथ:करण करता येत नाही.
प्रात्यक्षिक परीक्षा :
भाषेच्या परीक्षेत भाषा कौशल्य (भाषण, वाचन, लेखन, श्रवण, संभाषण) परीक्षणालाही महत्त्व आहे. सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य परीक्षण करावे. भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून भाषा कौशल्य विकसित करता येते व परीक्षण ही करता येते.
प्रश्न प्रकार :
प्रश्नाचे उत्तर कोणत्या प्रकारचे आहे, यावरून प्रश्नाचे स्वरूप ठरते. विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर एक किंवा दोन शब्दात द्यायचे असेल तर ते वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार होय. प्रश्नाचे उत्तर 4-5 ओळीत देणे अपेक्षित असेल तर त्याला लघुत्तरी प्रश्न प्रकार म्हणतात.
प्रश्नाचे उत्तर 10-15 ओळीत देणे अपेक्षित असेल तर त्याला दीर्घोत्तरी किंवा निबंधवजा प्रश्न प्रकार म्हणतात. साधारणतः प्रश्नांचे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी असे प्रश्न प्रकार पडतात. लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार व्यक्तिनिष्ठ आहेत तर वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ आहे.
वस्तुनिष्ठ :
ज्या प्रश्नाचे उत्तर 1-2 शब्दात देता येते त्या प्रश्न प्रकाराला वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्नाचे उत्तर निश्चित स्वरूपाचे असते. परीक्षकाचा उत्तर परीक्षणावर कोणताही प्रभाव पडत नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये खरे-खोटे सांगा, बहुपर्यायापैकी योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा, जोड्या जुडवा इ. स्वरूपाचे प्रश्न येतात. वस्तुनिष्ठ प्रश्नप्रकार विश्वसनीय व यथार्थ असते. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारता येते.
विशिष्ट उद्दिष्टाचे मापन करता येते. वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीत यांत्रिक स्मरणावर विद्यार्थी भर देतात. तर्कशुद्ध मांडणी, विचारातील सुसंगती, भाषाप्रभुत्व याचे मापन करता येत नाही. चांगल्या अध्ययन सवयींना उत्तेजन मिळत नाही तर अंदाजाने उत्तर देण्यास उत्तेजन मिळते.
लघुत्तरी :
ज्या प्रश्नाचे उत्तर 4-5 वाक्यात देता येते त्या प्रश्न प्रकाराला लघुत्तरी प्रश्न असे म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न यातील सुवर्णमध्य म्हणजे लघुत्तरी प्रश्न होय. वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न पद्धतीचे गुणदोष लघुत्तरी प्रश्न प्रकारात दिसून येतो.
दीर्घोत्तरी :
ज्या प्रश्नाचे उत्तर 10-15 वाक्यात देता येते त्या प्रश्न प्रकाराला दीर्घोत्तरी प्रश्न किंवा निबंधवजा प्रश्न असे म्हणतात. निबंधवजा प्रश्न विचार प्रवर्तक व सर्जनशील विचारांना वाव देणारे असतात. आकलन, कल्पना विस्तार, मुद्देसूद मांडणी, पृथ:करण व संकलन इत्यादीचे मापन करता येते. निबंधवजा प्रश्न पद्धतीत योग्य अध्ययन सवयींना उत्तेजन दिले जाते. परंतु दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारात संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्न विचारणे कठीण होते. लेखनशैली, हस्ताक्षर, उत्तराची व्याप्ती याचा प्रभाव पडतो. विश्वसनियता व यथार्थता कमी होते.
वार्तालाप में शामिल हों