अभ्यासपुरक कार्यक्रम - exercise program
अभ्यासपुरक कार्यक्रम - exercise program
'शिक्षण म्हणजे सर्वागीण विकास' हे ध्येय सर्वमान्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेच्या दृष्टीने तयार करणे एवढेच शिक्षणाचे उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत क्षमतांचा विकास करणे अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमांचा आधार सहायक ठरतो. व्यक्तिमत्त्वाची योग्य जडणघडण बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक पातळीवरही करण्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमाची जोड दिली जाणे आवश्यक ठरते. या कार्यक्रमांना अभ्यासेतर वा अभ्यासानुवर्ती कार्यक्रम असे न म्हणता अभ्यासपूरक कार्यक्रम असे म्हणतात.
अभ्यासपूरक कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे विविधता व नावीन्य होय. दैनंदिन अध्यापनातील रुक्षपणा कमी करून चैतन्यपूर्ण वातावरण निर्मितीकरिता अभ्यासपूरक कार्यक्रम उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव देवून विद्यार्थ्याचा सक्रीय सहभाग वाढविता येते. कारण शिक्षणात विद्यार्थी कृतीशील असणे आवश्यक आहे.
या दृष्टिणे अभ्यासपूरक कार्यक्रमाचे आयोजन करणे महत्त्वाचे व उपयुक्त आहे. मराठी भाषेच्या अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खालील अभ्यासपूरक कार्यक्रम आयोजित करता येईल.
1) अवांतर वाचन
विद्यार्थ्यात वाङमयाविषयी अभिरूची वाढविण्यास अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. पाठ्यांशाचे अर्थपूर्ण आकलन होण्यास अवांतर वाचन उपयुक्त आहे. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने योग्य पूरक पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांना करण्यास प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांना आपली मते प्रगल्भ व व्यापक करून योग्य प्रकारे मांडता येतील. अवांतर वाचनामुळे ज्ञानप्राप्तीचा आवाका वाढविता येतो. वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके, विशेषांक इत्यादीतील लेख पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशासी संबंधित असल्यास त्याचे पूरकवाचन सहाय्यभूत ठरते.
2 ) चर्चा -
विद्यार्थ्यांना पूरक वाचानाकरिता जे पुस्तक वाचावयास दीले त्यावर चर्चाही घडवून आणता येते. चर्चेत विद्यार्थी आपली मते मुक्तपणे अभिव्यक्त करू शकतात. चर्चेसाठी शिक्षकाने पुढाकार घ्यावा. चर्चेत शिक्षकही सहभागी होवू शकतात. शिक्षकाने चर्चेचे सुयोग्य नियोजन करावे. सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने चर्चा यशस्वी करता येते. संकुचित वृत्तीचे विद्यार्थी चर्चेत सहभागी होऊ शकतात.
3) भाषण, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, वादविवाद इत्यादी -
आपले विचार इतरांसमोर व्यवस्थितपणे मांडण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास विकसित करावा लागतो. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाचे संचालन आभारप्रदर्शन इ. कार्यक्रम विद्यार्थ्याकडे सोपवावेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना कथाकथन, अनुभव कथन, प्रसंगवर्णन इ. सांगावयास संधी द्यावी.
संभाषण चातुर्य असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वक्तृत्वस्पर्धा, समयस्फूर्त भाषणस्पर्धा, वादविवाद स्पर्धा इ. कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यार्थ्याना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे. 4) काव्य गायन
संगीत शिक्षकाच्या मदतिने कवितांना योग्य चाली लावून गायन केल्यास विद्यार्थ्यात रसग्रहण क्षमता वाढते. काही कवितांच्या ध्वनीमुद्रिका उपलब्ध असतात. उपलब्ध ध्वनिमुद्रिका विद्यार्थ्याना ऐकवाव्यात. आकाशवाणीवरील काव्य गायनाच्या कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकात करावे. कवीसंमेलन, काव्यदर्शन कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचे कविसंमेलन आयोजित करता येईल.
5) नाट्यवाचन -
मराठी पाठ्यपुस्तकात नाटक हा अभ्यासक्रमाचा अभिन्न अंग आहे.
विद्यार्थ्यात वाङमयीन अभिरुची विकसित करण्यासाठी नाट्य वाचन व नाट्य अभिनय उपयुक्त ठरते. नाटकातील आशययुक्त उतारा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नेमलेला असतो. वाइयीन दृष्टिकोणातून नाटक या साहित्यप्रकाराची ओळख व्हावी म्हणून पाठ्यपुस्तकातील नाट्य उताराची निवड केलेली असते. नाटयप्रवेश ज्या नाटकातून घेतला आहे त्याचेही वाचन विद्यार्थ्याकडून करवून घेता येते. त्यातील प्रसंगचे प्रत्यक्ष सादरीकरण करवून घेता येईल. अर्थातच विद्यार्थ्यामध्ये नाट्याभिरूचीचा विकास घडवून आणता येईल.
6 ) हस्तलिखिते -
विद्यार्थ्यामध्ये कल्पनाशक्ती, सृजनशीलता निर्माण करण्याचे एक यशस्वी व प्रभावी साधन म्हणजे हस्तलिखिते होय. दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक हस्तलिखित काढून विद्यार्थ्यात सर्जनशीलता विकसित करता येते.
वर्गपरत्वे व विषयपरत्वे हस्तलिखित प्रकाशित करणे नवोपक्रम ठरेल. हस्तलिखिताकरिता स्वरचना निर्माण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा सहभाग करू शकतो. घटना, व्यक्ती, विषय क्षेत्र, प्रसंगांवर आधारित देखील हस्तलिखित काढता येईल. उदा. स्वातंत्र्य विशेषांक, पर्यावरण विशेषांक, मानवी हक्क विशेषांक, साहित्यिक परिचय.
7) स्पर्धा
विविध स्पर्धा प्रकाराचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाला मदत करता येते. स्पर्धातून विद्यार्थ्यांना कार्यप्रेरणा मिळते. विविध स्पर्धातून विद्यार्थ्यात विजीगिशु वृत्ती विकसित करता येते. त्यांच्यात भाषिक कौशल्याचा विकास घडवून आणता येतो. उदा. हस्ताक्षर, शब्दकोडे, शुद्धलेखन, निबंध, वाचन, कथाकथन, वक्तृत्व इ.
8) इतर उपक्रम -
विद्यार्थ्याकडून पाठांतर करवून घेणे, साहित्यिकांच्या जयत्या पुण्यातिथ्या साजऱ्या करणे, साहित्याचे प्रदर्शन भरविणे, साहित्यिकांची भाषणे ठेवणे, भाषादिवस आयोजित करणे, भाषा खेळ आयोजित करणे, उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात पोषक व महत्त्वपूर्ण ठरते. मराठी भाषेची निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमाची निवड, नियोजन, आयोजन करण्याची मुख्य जबाबदारी मराठी भाषा शिक्षकाची आहे. अभ्यासपूरक कार्यक्रम अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे आहे.
9) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, रसास्वाद
विद्यार्थ्यात स्वयं अध्ययन क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यात पूरक वाचनाची सवय वृद्धींगत करणे, वाङमयीन अभिरुची व अभिवृत्ती विकसित करणे, साहित्य व साहित्तीकाची ओळख समजून घेणे, रसग्रहण क्षमता विकसित करणे इ. उद्दिष्टाची पूर्तता करण्याकरिता विविध उपक्रम, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे आयोजन करून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणता येईल.
वार्तालाप में शामिल हों