भाषेची वैशिष्ट्ये, तत्वे व प्रकार - Features, principles and types of language
भाषेची वैशिष्ट्ये, तत्वे व प्रकार - Features, principles and types of language
1 भाषेची वैशिष्ट्ये :
भाषेची अभिव्यक्ती मौखिक व लिखित अशा दोन्हीही पद्धतीने होते. मौखिक भाषा जेव्हा लिपिबद्ध केली जाते तेव्हा ती लिखित स्वरूपात येते. लिखित भाषेचा उपयोग समाज व संस्कृतीच्या संवर्धनासाठी केला जातो. आपला वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविण्याचा सोपा मार्ग म्हणजे लिखित भाषा होय. जनमानसात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. ती पुढीलप्रमाणे
(अ) अनुकरणशीलता :
बालकाचा जन्म झाल्यावर आपल्या घरातील भाषेचेच ते अनुकरण करते. घरात बोलली जाणारी भाषा बालक ऐकते, बोलायला शिकते. घरातही त्याच्या कानावर पडणारे बोल साधारणत: मातेचेच असतात.
बालकाच्या मातृभाषेचा उगम येथे होतो. घरानंतर ते बालक शेजारी जाते. तेथेही भाषा ऐकते, बोलते, त्याचेही अनुकरण करते. भाषाशिक्षणाचे हे अनुकरण शाळेमध्येही सुरूच असते. म्हणून 'शिक्षक' या नात्याने आपण वैशिष्ट्यांची दखल घेणे आवश्यक आहे.
(ब) भाषेची समाज सापेक्षता:
भाषा ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. परंपरेनुसार चालत आलेली भाषा व्यक्ती बोलतो. समाजात काळानुरूप भाषेचा विकास होतो. एकीकडे व्यक्ती समाजाकडून भाषा शिकतो, तर दुसरीकडे भाषेमुळे समाजाचा विकास होतो.
(क) भाषेची परिवर्तनशीलता :
देशाकाल स्थितीनुसार भाषेतही परिवर्तन होत असते. भाषेतील हे परिवर्तन ध्वनी, शब्द, पदबंध तसेच वाक्यरचनेच्या संदर्भात होते. भाषेच्या या बदलत्या स्वरूपामुळे असे म्हणता येते की,
भाषेचे एकच एक रूप किंवा अंतिम रूप नसते, ती काळानुसार बदलत जाते. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधील मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा ही याचीच उदाहरणे किंवा शिवाजीराजांनी व्यंकोजींना लिहिलेल्या पत्रातील मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा ही काळानुरूप बदलते हे याचेच उदाहरण होय.
2. भाषा शिक्षणाची तत्त्वे :
भाषा शिक्षणाच्याही मानसशास्त्रीय, तात्त्विक व शास्त्रीय बाजू असतात. म्हणजेच भाषेचे अध्ययन करताना भाषेवर प्रभाव गाजविणाऱ्या या तात्विक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय घटकांची दखल घ्यावी लागते. मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा संबंध खूपच जवळचा असतो. त्या-त्या समाजाची एक भाषा असते. सामाजिक परिसराचा परिणाम भाषेवर होतो. म्हणून तर मराठी ही एकच भाषा असली तरी सांगली, कोल्हापूरच्या भाषेचे काही वेगळे वळण असते. सोलापूर, नगरची मराठी आणखीनच वेगळी वाटते तर मराठवाडयातील मराठी खानदेशात कुतूहलाचा विषय ठरते. यातूनच भाषा अध्ययनाचे 'सामाजिक तत्त्व उदयाला येते.
मानसशास्त्राचा प्रभाव ही भाषेवर खूपच असतो. स्वयं अध्ययन, अध्यापन सूत्रे, सरावाचे महत्त्व, अनुकरणाचे महत्त्व, बालकेंद्रित अध्ययन, अभिरूचीचे महत्त्व, वैयक्तिक भिन्नतेचे महत्त्व, भाषा अध्ययनात खूप असते. यामधूनच भाषा अध्ययनाची काही तत्त्वे ठरतात. मानसशास्त्र माहीत असेल तर ती तत्त्वे अधिक चांगली समजतात आणि भाषेचे अध्ययन सहज होते. पण मानसशास्त्र माहीत नसेल तरी तत्वे समजून भाषेचे अध्ययन अध्यापन झाले तर दोन्हीचाही प्रभाव वाढतो. काही विषयात घटनांना अधिक महत्त्व असते. संकल्पनांना अधिक महत्त्व असते तर भाषा अध्यापनात सामान्यीकरणाचे महत्त्व अधिक असते. म्हणूनच घटक किंवा संकल्पना याकडून आपल्याला तत्त्वाकडे जावे लागते. या तत्त्वांचाच भाषा अध्यापनात खूप उपयोग होतो. त्यातील काही नमुनादाखल तत्त्वे येथे *दिली आहेत. यापेक्षाही अधिक तत्त्वे असू शकतात. सामान्यीकरण प्रक्रियेमुळे त्यामध्ये अधिकाधिक भरच पडत जाणार आहे; परंतु तोपर्यंत पुढील काही तत्त्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. ती तत्त्वे शिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मूल भाषा जरी अनुकरणाने कुटुंबात शिकत असले तरी भाषा शिकताना काही घटक त्याला मदत करतात तर काही विघातक घटकांमुळे भाषा अध्ययनात अडथळे येतात. मूल भाषा कशी शिकते ? या प्रक्रियेत कोणते नियम तत्त्वे येतात हे बघणे गरजेचे ठरते.
वार्तालाप में शामिल हों