पाठ्यपुस्तकाचे अंतरंग - Inside the textbook
पाठ्यपुस्तकाचे अंतरंग - Inside the textbook
पाठ्यपुस्तकाचा दर्जा हा त्याच्या बहिरंगापेक्षा अंतरंगावरच अवलंबून असतो. म्हणून अंतरंगाच्या निकषाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
1) अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला आराखडा -
पाठ्यपुस्तक लेखनाचे सर्वात अवघड काम म्हणजे अभ्यासक्रमाच्या तत्त्वनुसार केलेली पाठाची रचना होय. अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेऊन कोणत्या भागावर किती लिहायचे याचे तारतम्य पाठ्यपुस्तक तयार करणा-यांनी ठेवले पाहिजे. यासाठी सर्वात प्रथम पाठ्यपुस्तकाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक निर्मितीचा आरसा असतो. त्यात पाठांची संख्या, त्या पाठांचा क्रम, पृष्ठसंख्या, पाठात येणाऱ्या आकृत्या, चित्रे व तपशील याचा विचार व्हावा. आराखडा लवचिक पण विचारपूर्वक तयार केलेला असावा. अर्थातच आराखडा सर्वसमावेशक असावा.
2) वेच्यांची निवड -
मुलांची वाङ्मयीन आवडनिवड लक्षात घेऊन पाठांची योजना चोखंदळपणे करावयास हवी. वेच्यामध्यून द्यावयाच्या बिनचूक विषयज्ञानाची निश्चित माहिती करून दीली पाहिजे. निवडलेले पाठ हे मनोरंजक, उद्बोधक व संस्कारक्षम असायला हवेत. पाठ्यपुस्तकातील मजकूर विद्यार्थ्यांच्या वय, क्षमता, रुचीनुसार असायला हवा. पाठातून वाङमयीन मूल्ये, जीवनविषयक मूल्यांचा विचार व्हावा. विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचाही विचार करणे अत्यावश्यक ठरते. एकंदरीत संपादनाची सम्यक दृष्टी असल्याशिवाय दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्माण करता येणार नाही.
3) पाठ्यपुस्तकातील पाठांची मांडणी -
विद्यार्थ्यांचे लक्ष मजकूराकडे केंद्रित करण्याकरिता पाठ्यपुस्तकातील मजकूराची मांडणी तर्कशुद्ध व आकर्षक असणे महत्त्वाचे आहे. मजकूर परिच्छेदातून प्रभावी व आकर्षकरित्या मांडला गेला पाहिजे.
एका मुद्दयातून दुसरा मुद्दा सहजपणे मांडत मांडत वैचारिक पातळी उत्तरोत्तर वाढविता आली पाहिजे. मुद्दयातील विचार स्पष्टपणे सुयोग्य भाषेत मांडले गेलेले असले पाहिजेत. पाठाची मांडणी करतांना कालानुक्रम पाळला गेला पाहिजे. मूल्यामापनाच्या दृष्टिने घटकानुसार मांडणीचे तंत्र मातृभाषेच्या पाठ्यपुस्तकातही सांभाळायला हवे.
4) पाठ्यपुस्तकातील वेच्यांची भाषा
पाठ्यपुस्तकातील वेच्यांची भाषा विद्यार्थ्याच्या वयानुसार असावी. लहान वयातील विद्यार्थ्यांसाठी सोपी व साधी भाषा व वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी थोडी वाङमयीन गुणांनीयुक्त अशी भाषा वापरावयास हवी... भाषेतील रुक्षपणा टाळून ती रंजक असावी. इयत्तावार श्रेणीबद्ध शब्दसंपत्तीचा विचार पाठ्यपुस्तकातील भाषेच्या बाबतील करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांची ग्रहण व आकलनशक्ती आणि वय विचारात घेऊन भाषा वापरली जावी. प्रमाणित भाषा वापरणे आवश्यक असते. व्याकरण शुद्धता असावी.
5) पाठ्यपुस्तकातील चित्रे आकृत्या -
“one picture is worth a thousand words" अर्थात एका चित्रातून हजार शब्दाचा आशय व्यक्त करत येतो. चित्रभाषा ही भाषेच्या आधी समजते. चित्रात योग्य तऱ्हेने आशय मांडण्याचा प्रयत्न केला तरच आशय विद्यार्थ्यांना सहज समजू शकतो. पाठ्यपुस्तकातील चित्रे काढतांना पाठातील संपूर्ण मजकूर चित्रकाराला माहित असायला हवा. चित्रे ही पाठ्यपुस्ताकाची शोभा व विद्यार्थाची आकलन क्षमता वाढविते. अभिव्यक्तीचे साधन म्हणूनही चित्रे उपयुक्त आहे.
6) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, रसास्वाद
पाठ्यपुस्तक अध्ययन-अध्यापनाचे महत्त्वाचे कार्य साधक असल्याने त्यातील स्वाध्यायाचे स्वरूप कसे असावे ह्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. विद्यार्थ्याचे अध्ययन सुकर व्हावे म्हणून त्यातील स्वाध्याय व प्रश्न मानसशास्त्रीय बैठकीवार आधारित असावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिनेही स्वाध्यायचे महत्त्व कदापि विसरता येणार नाही. स्वाध्यायातून विद्यार्थ्याच्या क्रियाशीलतेला वाव मिळाला पाहिजे. स्वाध्यायातील प्रश्नात भाषाभ्यासही समाविष्ट असावा. स्वाध्यायाच्या खाली तळटिपा व संदर्भ देखील असावेत ज्यामुळे शिक्षकाला देखील विषय समजावून देणे सोपे जाईल. स्वाध्यायातून विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य इत्यादिचेही मापन व्हावे. विद्यार्थ्यांना पूरक वाचानाद्वारे इतर माहिती मिळविण्याची जिज्ञासा त्यातून वाटावयास हवी. त्यातील प्रश्न तिन्ही प्रकारातील म्हणजे लघुत्तरी, वस्तुनिष्ठ आणि निबंधवजा असावेत. विद्यार्थ्याच्या कृती, क्षमता, छंद, कल्पना, नव निर्मिती इ. च्या वाढीस पोषक ठरतील असे स्वाध्याय पाठ्यपुस्तकात द्यावे.
7) पाठ्यपुस्तकातील मानसशास्त्रीय दृष्टिकोण -
आजची शिक्षण पद्धती मानसशास्त्रीय तत्वावर अधिष्टीत आहे. ज्या मुलांना शिकवायचे त्यांचा विचार आधी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा वयोगट, पूर्वज्ञान, शब्दसंग्रह, संस्कार इ. चा विचार करून पाठाची नियोजन केले पाहिजे. पाठ्यपुस्ताकतील पाठ वाचून मुलांना सतत विचार प्रवृत केले पाहिजे, पाठ्यपुस्तके मुलांनी आवडीने वाचवीत असे पाठ्यपुस्तकातील लेख, कविता, स्फुटलेखन, वैचारिक लेख असावयास हवे.
एकंदरीत कोणत्याही आदर्श पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करतांना खालील गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे.
1) लेखकांची पात्रता 2) विषय प्रतिपादन 3) अभ्यासक्रमानुसार केलेला आराखडा 4) मजकूराचा विस्तार 5) निर्दोषता 6) वाचनीयता. एकंदरीत बहिरंग व अंतरंगाचा समग्र विचार करता पाठ्यपुस्तक हाताळतांना विद्यार्थ्याना आनंदप्राप्ती उपभोगता आली पाहिजे.
वार्तालाप में शामिल हों