व्याख्यान पद्धती - Lecture methods
व्याख्यान पद्धती - Lecture methods
व्याख्यान चालू असतांना श्रोत्यांची भूमिका विद्यार्थ्यांची असते. व्याख्यान श्रवणीय, चैतन्यपूर्ण, औत्सुक्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांचे अवधान राहते. बोलणाऱ्या वक्त्याची गती. लय, शब्दसंपदा, तयारी यावर विद्यार्थ्यांचे आकलन अवलंबून असते. विद्यार्थ्याला एकाचवेळी श्रवण, आकलन, लेखन इत्यादी विविध कृती करतांना त्यांची तारेवरची कसरत होते. परिणामी निश्चित केलेली उद्धीष्टये साध्य होण्यात अडथळा निर्माण होतो.
एखाद्या विषयासंबंधी माहिती सहजासहजी देण्यासाठी व्याख्यान पद्धतीचा चांगला उपयोग करता येतो. व्याख्यान चांगले व्हायचे असेल तर विविध उदाहरणांनी, दाखल्यांनी कथांनी प्रसंगांनी व्याख्यानात रंजकता आणावी लागते. वक्त्याचे शब्द सामर्थ्य प्रभावी असावे लागते. व्याख्यानात सहजता, स्पष्टपणा, आवाजातील चढउतार, विनोदप्रचुर निवेदन, मुद्द्याची मांडणी, पूर्वनियोजन, तयारी व्यवस्थित असावी लागते.
व्याख्यानात विषयांतर टाळून बोलण्यात रंजकता, विनोद बुद्धी, सहजता असेल, उदाहरणे, दृष्टांत देण्यात हातखंडा असेल तर व्याख्यान चांगले रंगते व त्याचा परिणामही विद्यार्थ्यांवर उत्तम व प्रभावी होतो. व्याख्यान पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील.
गुण :
1) व्याख्यान पद्धतीचा उपयोग तत्त्व, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी होतो.
2) नवीन माहिती, घटना, प्रसंग, निवेदनासाठी व्याख्यान पद्धतीसारखा दुसरा मार्ग नाही.
3) विविध साधनांचा प्रभावी वापर करून व्याख्यान देता येते.
4) मोठा घटक कमी कालावधीत पूर्ण करता येते.
(5) रसग्रहण चांगल्याप्रकारे करता येतो.
6) प्रभावी व्याख्यानाच्या सहायाने भावनांना आवाहन करता येते.
7) दुर्मिळ व महत्त्वपूर्ण माहिती सहज देता येते.
8) विशिष्ट भाषाशैलीची प्रचिती व भाषेवरील प्रभाव व्याख्यान पद्धतीमुळे कळू शकते.
9) विद्यार्थ्यांची विचार अभिव्यक्ती विकसित करण्याकरिता उपयुक्त आहे.
दोष :
1) व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय बनतात.
2) विद्यार्थ्यांच्या विचार, आकलन, तर्कशक्तीचा विकास योग्य प्रकारे होत नाही.
3) विद्यार्थ्याचे अवधान सातत्य राहत नाही.
4) व्याख्यान दीर्घकाळ असल्याने विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होत नाही.
5) व्याख्यात्याच्या ठिकाणी व्याख्यान कौशल्य नसतील तर निट आकलन होत नाही.
6) व्याख्यान रंजक, रोचक, क्रियाशील, प्रभावी नसेल तर श्रोत्यांना कंटाळा येतो.
7) निम्न वर्गातील विद्यार्थ्यांकरिता ही पद्धती अनुपयुक्त आहे.
वार्तालाप में शामिल हों