मराठी आणि इंग्रजी , मराठी आणि इतर भाषा - Marathi and English, Marathi and other languages
मराठी आणि इंग्रजी , मराठी आणि इतर भाषा - Marathi and English, Marathi and other languages
इंग्रजी भाषा ही जगातील श्रेष्ठ भाषा आहे. इंग्रजी भाषेचे शब्दभांडार विपुल आहे. इंग्रजी भाषेला थोर परंपरा आहे. या भाषेत उत्कृष्ट साहित्याची रेलचेल आहे. इंग्रजी भाषेच्या या वैभवाकडे, या श्रीमतीकडे पाहिले तर मराठी भाषा त्या मानाने फारच अपुरी वाटते. सर्व शास्त्रांचे ज्ञान इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहे हे इंग्रजी भाषेचे खास वैशिष्टय म्हणून नमूद करता येईल.
इंग्रजांमुळे आपला देश इंग्रजी भाषेच्या संपर्कात आला. भारतीयांचे अगदीच काही फायदे झाले नाहीत असे म्हणता येणार नाही पण इंग्रजीमुळे देशाचे जे तोटे झाले त्याचे पारडे जड आहे यात तिळमात्र संशय नाही. इंग्रजी भाषेच्या संपर्काने आम्ही भारतीय इतके दिपून गेलो की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या भाषेवर खऱ्या अर्थाने आम्हास प्रेम करता आले नाही. हिंदीवरही नाही आणि मराठीवरही नाही! इंग्रजी शब्दांचा मारा आमच्या भाषेवर इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की आमच्या भाषेतील शब्द वापरण्यापेक्षा आम्ही इंग्रजीतीलच शब्द अधिक वापरून मराठी बोलू लागलो. इंग्रजीचे वर्चस्व इतके वाढले की शुभप्रभात' म्हणणे किंवा 'नमस्कार' म्हणणे आम्हाला अवघड वाटू लागले. 'गुड मार्निंग',
'गुड आफ्टरनून सर', 'गुड नाईट', 'बाय-बाय' या शब्दांनी आम्हाला अक्षरश: वेडे केले. मेज शब्दाबद्दल टेबल शब्द वापरणे आम्हाला सोपे वाटू लागले. 'गुरूजी' शब्द आम्हाला अगदीच खेडवळ वाटू लागला. त्याऐवजी 'टीचर' ऐटबाज व रूबाबदार वाटू लागला !
हे असे सगळे विलक्षण घडले असले तरी विद्यार्थ्यांना आम्ही इंग्रजी साहित्यिकांचा व इंग्रजी साहित्याचा परिचय करून दिलाच पाहिजे. भाषा ही शेवटी मानवाच्या कल्याणासाठी असते. इंग्रजी-मराठी सहसंबंध प्रस्थापित करून विद्यार्थ्यांच्या विकासाचा मार्ग खुला करून देणे हे आम्हा शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. साहित्याप्रकारांचे उत्तमोत्तम नमुने इंग्रजीमध्ये आहेत. ते भाषांतरित स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावेत. इंग्रजी भाषेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर मराठी भाषा निश्चितपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल.
मराठी आणि इतर भाषा :
संस्कृत, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांप्रमाणे कानडी, तेलगू, उर्दू, गुजरती, सिंधी या भाषांचा सहसंबंध ही महत्त्वाचा आहे. या भाषांची धाटणी वेगळी असली तरी त्या भाषांपासून मराठी भाषेचे बरेच काही घेतले आहे. उर्दू भाषेतून आम्ही शेर, गझल हे वाड्.मय प्रकार मराठी साहित्यात आणले आणि ते चांगलेच लोकप्रिय झाले. कानडी आणि गुजराती भाषेतील शब्द आम्ही मराठीत घेतले व ते शब्द आता आमचे होऊन गेले. तेलगू साहित्याला खूप मोठी परंपरा आहे. त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. तेलगू भाषेतील काही नमुने मराठी भाषेत भाषांतरित करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. या भाषेत लेखन करण्याचा श्रेष्ठ साहित्यिकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. महाराष्ट्राला कर्नाटक आणि गुजरात तसे जवळचे आहेत. त्यांच्या साहित्याशी व भाषांशी आमची मुळात जवळीक आहेच. सहसंबंधातून ही जवळीक अधिक दृढ होईल.
वार्तालाप में शामिल हों