मराठी आणि संस्कृत , मराठी आणि हिंदी - Marathi and Sanskrit, Marathi and Hindi

मराठी आणि संस्कृत , मराठी आणि हिंदी - Marathi and Sanskrit, Marathi and Hindi


आपली मराठी भाषा ही संस्कृतपासून निर्माण झालेली भाषा आहे. मराठी भाषेतील बरेचसे शब्द संस्कृतमधून आले आहेत. काही शब्द थोड्याफार फरकाने मराठी भाषेत समाविष्ट झाले आहेत. मराठीतील प्राचीन वाङ् मयावर संस्कृत भाषेची छाप पडलेली दिसते. विशेषत: पंडिती काव्य संस्कृत काव्यासारखे बोजड आहे. मराठी भाषा आणि संस्कृत भाषा यांच्या व्याकरणात बरेचसे साम्य आहे. वाक्यरचनाही कर्ता, कर्म आणि नंतर क्रियापद अशीच आहे. संस्कृतप्रमाणे मराठीतही तीन लिंगे आहेत. संस्कृत आणि मराठी या भाषांची लिपी देवनागरी आहे. संस्कृतमध्ये श्रेष्ठ दर्जाचे साहित्य आहे. त्या साहित्याचे भाषांतर मराठीत झाले आहे. संस्कृतमध्ये उत्तम रचना करणारे कालिदास, भवभूती, मराठी मनास भावतात. मराठीच्या आधारे संस्कृत भाषेचा परिचय करून घेणे सोपे आहे. त्या भाषांत असलेल्या सारखेपणाचा उपयोग करून घेता येईल. संस्कृतमध्ये 'सुभाषिते' हा खास वाड्.मयप्रकार आहे. त्या सुभाषितांचा उपयोग मराठी भाषेतील साहित्यात दागिन्यांसारखा करून घेता येतो. संस्कृतमधील प्रमुख वचनांचा अवतरणे म्हणून वापर करता येतो. संस्कृत भाषा ही मराठीची माता आहे. संस्कृतच्या अभ्यासाने मराठी समृद्ध होईल.


मराठी आणि हिंदी :


मराठी ही राज्यभाषा तर हिंदी राष्ट्रभाषा हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी देशाचा कारभार इंग्रजीतून चालतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. जगातील बहुतेक राष्ट्रे आपल्या भाषेला मानाचे स्थान देतात. सर्व व्यवहारासाठी अगदी माध्यमाची भाषा म्हणूनही राष्ट्रभाषेचा उपयोग करतात. पण आमच्या देशात हिंदी हटाव' ची मोहीम हाती घेतली जाते. सर्व राज्यांत हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे. कोणतेही राज्य त्याला अपवाद असता कामा नये.


मराठी भाषेप्रमाणे हिंदी भाषा ही संस्कृतोद्भव आहे. एका आईच्या या दोन मुली आहेत. त्यांच्यात खूप साम्य आहे. हिंदीतही बरेचसे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत. हिंदीत संस्कृत शब्दांचा वापर अधिक केला तर ती संस्कृतप्रचुर हिंदी म्हणून ओळखली जाते. हिंदी आणि मराठी व्याकरणात बरेच साम्य आहे.

वाक्य संपल्यावर चरणदंड देण्याची पद्धत होती. आता नवभारत टाईम्सची सर्व प्रकाशने चरणदंडाऐवजी संस्कृत मराठीतील पूर्णविरामाचा वापर करतात. हिंदी-मराठी वाक्यरचनेत साम्य आहे. मराठी भाषेप्रमाणेच हिंदी साहित्य समृद्ध आहे. हिंदी साहित्यातील संतकाव्य अजरामर आहे.


हिंदी साहित्यातील काही प्रसिद्ध रचनांचे मराठीत भाषांतर करून विद्यार्थ्यांपर्यंत ते पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून पोहोचविले पाहिजे. मराठी शिकविताना हिंदी साहित्यातले दाखले द्यावेत. अवतरणांचा वापर करावा. महाराष्ट्रात भाषाभ्यासात मराठी, इंग्रजी या भाषांबरोबर विद्यार्थी हिंदीचा आवडीने अभ्यास करतात. राज्यांतील संपर्क भाषा म्हणून हिंदीचे स्थान अढळ आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनी राष्ट्राशी हिंदीतूनच बोलले पाहिजे. इंग्रजीची गुलामगिरी टाकून देऊन राष्ट्रभाषेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागृत केले पाहिजे. देशात एकता व प्रेम निर्माण करावयास हिंदी भाषेसारखे दुसरे माध्यम नाही