मराठी भाषेचे अभ्यासक्रमातील स्थान व महत्त्व - The place and importance of Marathi language in the curriculum

मराठी भाषेचे अभ्यासक्रमातील स्थान व महत्त्व - The place and importance of Marathi language in the curriculum


क) प्रथम भाषा मराठी:


महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी मातृभाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राथमिक स्तरावरील सामाजिक शास्त्रे, विज्ञान व गणित हे विषय शिकण्याचे महत्त्वपूर्ण साधन म्हणूनही मराठी भाषेचे अभ्यासक्रमास मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत मराठी भाषेचा दर्जा उच्चस्तरीय आहे. विद्यार्थी मराठी भाषा ही प्रथम भाषा म्हणून शिकतात. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय हे श्रवण, वाचन, संभाषण, प्रकटीकरण हे आहेत.


मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण स्थान आहे. भाषा हा आपल्या समाजाकडून मिळालेला महत्त्वाचा वारसा आहे. विचारांची देवाण-घेवाण करणे हे भाषेचे प्रधान कार्य आहे.

आपण आपले व्यवहार प्रामुख्याने मातृभाषेतून करतो आणि गरज भासली तर अन्य संपर्क भाषांचा वापर करतो. आपल्या व्यवहारात चैतन्याचा प्रवाह मातृभाषेमुळेच येतो. ज्ञानग्रह ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार ही कार्ये भाषेमुळेच शक्य होतात. प्रथम भाषा मराठीच्या अभ्यासक्रमात शुद्ध वाक्ये, शब्दांचे अर्थ व वाक्यसबंधाच्याद्वारे व्यक्त होणाऱ्या अर्थाची सूक्ष्मता, भाषेच्या विविध अंगावर मिळवावयाच्या प्रभुत्त्वाचा समावेश होतो. तसेच भाषेतील शुद्ध आणि वाक्यबंधाचा सूक्ष्मपणे वापर करण्याची क्षमताही निर्माण होणे अपेक्षित असते.


ख) मराठी द्वितीयभाषा:


इयत्ता पाचवीपासून मराठी भाषा द्वितीय स्तरावर शिकवण्याची योजना केलेली आहे. या स्तरावरील अभ्यासक्रमात मराठी भाषा बोललेली व लिहिलेली समजावी.

भाषा बोलता यावी व गरजेपुरती लिहिता यावी असे अपेक्षित आहे. मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, मराठी भाषिकाबद्दल आत्मीयता वाटावी आणि महाराष्ट्रीय जीवनसंस्कृतीशी समरस होता यावे हाही त्यातील एक प्रमुख हेतू आहे.


ग) मराठी-हिंदी संयुक्त अभ्यासक्रम :


मराठी ही आपल्या राज्याची, राजभाषा आहे. राज्यातील बहुसंख्य शाळा ह्या मराठी माध्यमांतून शिक्षण देतात. तसेच महाराष्ट्रात मराठी भाषिकांबरोबरच गुजराथी, सिंधी, उर्दू, कन्नड, तेलगू लोक राहतात. त्यांच्या शिक्षणाची सोय त्यांच्या मातृभाषेच्या माध्यमातून केलेली आहे. परंतु दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी केवळ मातृभाषेचा अभ्यास पुरेसा नाही. महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठी आणि भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळाव्यतिरिक्त,

तसेच उर्दू माध्यम असलेल्या काही शाळांव्यतिरिक्त अन्य भाषा माध्यमांच्या शाळांतील सहावी ते आठवी या इयत्तांसाठीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्यांनी मराठी भाषा बोललेली समजावी, ती बोलता- लिहिता यावी, मराठी भाषिकांशी संपर्क साधता यावा, त्यांच्याविषयी आपुलकी व प्रेम वाटावे आणि मराठी भाषेबद्दल आदर निर्माण व्हावा हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे.


घ) प्राथमिक शाळेत मराठी भाषा ही माध्यम भाषा:


मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे मराठी मातृभाषेतूनच मिळते. इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे माध्यमही मराठीच आहे म्हणून मराठी हा केवळ विषय नसून मराठी भाषेला शिक्षणाच्या माध्यमाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.