भाषण कौशल्य - Speech skills

भाषण कौशल्य - Speech skills


कानाने ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे त्याचप्रमाणे तोंडाला येईल ते बोलणे म्हणजे भाषण नव्हे. भाषण म्हणजे बोलणाऱ्याच्या शब्दातून त्याच्या स्वतःच्या मनोवृत्तीचे व विचारांचे अर्थपूर्ण प्रकटीकरण होय. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी सांगायचे असते. त्या सांगण्यातून त्याला मनोगत व्यक्त करायचे असते, भावना प्रकट करायच्या असतात, विचार मांडायचे असतात. हे सांगणे किंवा बोलणे म्हणजेच भाषण होय.


भाषणाची अंगे:


'भाषण' या क्रियेची अनेक अंगे आहेत. या सर्व अंगांचा विकास म्हणजेच भाषण कौशल्याचा विकास होय. भाषणाची अंगे पुढीलप्रमाणे सांगता येतात.


1) उच्चार:


भाषण म्हणजे अर्थपूर्ण बोलणे. हे बोलणे बहुतांशी दुसन्यासाठी असते. ते त्यामुळे उच्चार हे शुद्ध आणि स्पष्ट असावे लागतात. प्रत्येक वर्णांचा, शब्दांचा उच्चार अचूक असला पाहिजे. दुसऱ्याना समजले पाहिजे,


2) विराम:


बोलतांना श्वास घेण्यासाठी थांबणे आवश्यक असते. हा विराम विरामचिन्हांच्या ठिकाणी घ्यावा लागतो. प्रत्येक विरामाला एक अर्थ प्राप्त असतो.


3) स्वराघात :


बोलतांना अर्थाच्या दृष्टीने विशिष्ट वर्णांवर किंवा शब्दावर दिला जाणारा आघात महत्वाचा असतो. स्वराघात आवश्यक त्या ठिकाणी दिला नाही तर बोलण्याचा अर्थ बदलू शकतो.


4) आवाजातील चढ उतार


एखाद्या चित्राचा परिणाम त्याच्या रंगाच्या कमी-जास्त गडदपणात होतो. एखादया गाण्याचा परिणाम त्याच्या कोमल तीव्र स्वरात होतो. त्याचप्रमाणे भाषणाचा परिणाम त्याच्या आवाजातील चढ-उतारात होतो. आवाजातील चढ-उतार हा बोलण्याच्या आशयावर असतो. आवाजातील चढ-उतारामुळेच त्या आशयाची परिणामकारकता वाढते.


5) गती व उंची :


बोलण्याची गती ही योग्य असली पाहिजे. अति वेगवान गती किंवा अति संथ गती हानीकारक असते. बोलण्याच्या आशयानुसार गतीचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे आशयाच्या मागणीनुसार आवाजाला उंची द्यावी लागते.


भाषणांची उद्दिष्टये : भाषणाची दोन प्रकारे उद्दिष्ट्ये ठरवता येतात.


1. भाषणाचे सर्वसामान्य किंवा व्यावहारिक उद्दिष्ट्ये व 

2. भाषणाची शालेय किंवा शैक्षणिक उद्दिष्ट्ये..


अ) भाषणाची सर्वसामान्य / व्यावहारिक उद्दिष्ट्ये


सर्वसामान्यपणे किंवा व्यवहारात भाषण करण्याचे अनेक हेतू आहेत. या सर्व उदिदष्टांचा आढावा घेतल्यास भाषणाचे मानवी जीवनातील महत्त्व सुद्धा स्पष्ट होते. ही सर्वसामान्य किंवा व्यावहारिक उद्दिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतात. 


1) आत्मविष्कार :


स्वतःचे मनोगत, मनातील भावना, कल्पना, विचार योग्य शब्दातून व्यक्त करणे म्हणजे आत्मविष्कार होय. हा आत्मविष्कार प्रत्येक व्यक्तीची गरज असते. प्रत्येकाला व्यक्त होणे आवडत असते. त्यामुळे भाषण हे आत्मविष्काराचे प्रभावी साधन आहे. 


2) आनंदप्राप्ती व मनःशांती :


स्वतःचे विचार, कल्पना श्रोत्यांसमोर मांडून वक्त्यालाही आनंद प्राप्त होत असतो. आपल्या आनंदाचे अनुभव दुसऱ्यांना सांगण्यामुळे आनंद द्विगुणीत होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनाला टोचणारे बोलणारे, अनुभव, प्रसंग दुसऱ्यांना सांगून त्याद्वारे आपले मन मोकळे करणे व मनःशांती प्राप्त करणे. याप्रमाणे आनंदप्राप्ती व मनःशांतीसाठी भाषणाचा वापर केला जातो. 


3) स्वमताचा प्रचार :


आपले जे मत आहे, विचार आहेत. ते किती योग्य आहेत, ते विचार इतरांनीही मान्य करावेत म्हणून भाषणाद्वारे ते विचार इतरांपुढे प्रभावीपणे मांडले जातात व स्वत: च्या मताचा प्रचार केला जातो.


4) सर्जनशीलता :


बोलताना काहीतरी नवनिर्मिती होत असते. ही नवनिर्मिती शब्दांच्या उच्चारातून, शब्दांच्या वापरातून, बोलण्याच्या शैलीतून, विषय मांडण्याच्या पद्धतीतून घडत असते. म्हणून बोलणारा आपले भाषण आकर्षक, मनोरंजक व प्रभावी होईल यादृष्टीने बोलत असतो.


5) सामाजिक आंतरक्रिया :


समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या विचाराचा एकमेकांशी मेळ घालणे. एकमेकांत विचारांची देवाणघेवाण घडवण्याचे कार्य भाषणाद्वारे केले जाते.


ब) भाषणाची शैक्षणिक/ शालेय उद्दिष्टये :


आपण यापूर्वी भाषणाची सर्वसामान्य उद्दिष्टये पाहिली. भाषणाची शैक्षणिक उद्दिष्टये पुढीलप्रमाणे आहेत.


1. विद्यार्थ्यांना शुद्ध व स्पष्ट उच्चार करता येणे.


2. विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी आघात व विराम घेता येणे.


3. विद्यार्थ्यांना आवाजात योग्य चढ उतार ठेवून बोलता येणे;


4. विद्यार्थ्यांना योग्य गती ठेवून बोलता येणे.


5. विद्यार्थ्यांना बोलतांना योग्य शब्दांची निवड करता येणे.


6. विद्यार्थ्यांना आपले भावविचार सुसंगतपणे मांडता येणे.


7. विद्यार्थ्यांना सहजपणे, धीटपणे व आत्मविश्वासाने बोलता येणे.