दैनंदिन पाठाच्या पायऱ्या व महत्त्व - Steps and importance of daily lesson

दैनंदिन पाठाच्या पायऱ्या व महत्त्व - Steps and importance of daily lesson


दैनंदिन पाठाकरिता हर्बार्ट यांनी पायऱ्या सांगितलेल्या आहे, ज्याला मानसशास्त्रीय आधार आहे. यालाच ‘हर्बार्टची पंचपदी' असे सुद्धा म्हणतात. अध्ययन- अध्यापन रंजक, आनंददायी करणे शिक्षकाचा प्रायः उद्देश्य असतो. पाठ्यांशाला अनुकूल अध्यापन पद्धतीची व तंत्राची निवड शिक्षकाला करावी लागते. हर्बार्टच्या पंचपदीनुसार प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन व उपयोजन, गृहपाठ या पायऱ्या 1) प्रस्तावना :


हर्बार्टच्या पंचपदीनुसार दैनदिन पाठाची पहिली पायरी प्रस्तावना होय. Well being is half done' असे म्हणतात ते खरे आहे. पाठाच्या यशस्वी सुरूवातीतच पाठाची यशस्विता अवलंबून आहे. विद्यार्थ्यांना मुख्य विषयाकडे आकर्षित करण्याचे सामर्थ्य प्रस्तावनेत असते. प्रस्तावनेच्या माध्यमातून उत्सुकता, कुतूहल, अवधान केंद्रीकरण, पुर्वज्ञान जागृत करीत असतो. पूर्वज्ञान व प्रस्तावना यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. विद्यार्थ्यांची मने ज्ञानग्रहणासाठी तयार करणे प्रस्तावनेचे प्रमुख कार्य होय. विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करण्याचे कार्य प्रस्तावनेला करावयाचे असते.

अध्ययनाला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रस्तावनेद्वारे करता येते. पूर्वीच्या विषयात गुंतलेले मन आपल्या विषयाकडे खेचण्याचे महत्त्वाचे कार्य प्रस्तावनेला करावे लागते. विद्यार्थ्याचा दर्जा, वय, इयत्ता, पाठ्यविषय, पाठ्यांश, वातावरण इत्यादी गोष्टीवर आधारित विविध पद्धतीने प्रस्तावना करता येते. प्रश्न, निवेदन, कथा, चित्र व चित्रफित, प्रसंगवर्णन करून प्रस्तावना करता येते


2 ) हेतुकथन :


प्रस्तावना केल्यानंतर आज काय शिकणार आहे याची स्पष्ट शब्दात मांडणी करणे म्हणजे हेतुकथन करणे होय. प्रस्तावना व विषय प्रतिपादन यातील दुवा म्हणजे हेतुकथन होय. प्रस्तावनेतून निर्माण झालेली उत्सुकता वृद्धींगत करण्याचे कार्य हेतुकथनाद्वारे करता येते. आज आपण काय शिकणार आहे याची याची स्पष्ट कल्पना हेतुकथनाद्वारे विद्यार्थ्यांना होते. हेतुकथन सुस्पष्ट शब्दात व थोडक्यात करावे.


(3 ) विषय प्रतिपादन :


प्रस्तावनेद्वारे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत केल्यानंतर हेतुकथनानंतर शिकवायचा मुख्यविषय म्हणजे विषय विवेचन होय. विषय प्रतिपादन हा दैनंदिन पाठाचा आत्मा असतो. पाठ्यांशाचे प्रत्यक्ष अध्यापन विषय प्रतिपादनाद्वारे करता येते. शिक्षकाच्या प्रगट वाचनानंतर समग्र आशयावर आधारित हेतुप्रश्न द्यावा. त्यानंतर विद्यार्थ्यांना ओठाची हालचाल न करता मूकवाचन करण्यास सांगावे. शिक्षकाच्या प्रगट वाचनातून शब्दाचे स्पष्ट उच्चार कळतात तर मनोगत वाचनातून गतिशील वाचनाची सवय लागते. मुकवाचनानंतर शिक्षकाने विषय विवेचन करावे. शिक्षक कठीण शब्दाचा अर्थ स्पष्ट करतात, वाक्प्रचार व म्हणीचा अर्थ सांगतात, वाक्यात उपयोग करतात, पाठातील संदर्भ सांगतात. विषय विवेचनात शिक्षक विद्यार्थ्यांच्या असंख्य कृतीची गुंफण असते. निवेदन, प्रश्नोत्तर, स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घेऊन पाठ्यांश विद्यार्थ्यांना समजून सांगावा लागतो. 30-35 मिनिटाच्या वेळात 20-22 मिनिटे प्रत्यक्षात विषय विवेचन करावे लागते. 


4) संकलन व उपयोजन :


विषय विवेचनात शिकविलेला पाठ्यांश विद्यार्थ्यांना कितपत समजला याची पडताळणी करावी लागते. अर्थातच अध्ययन अध्यापनाचे मूल्यमापन करावे लागते. शिकविलेला भाग कितपत समजला याच्या परीक्षणाकरिता त्या भागावर प्रश्न विचारले जातात. शिक्षक आपल्या अध्यापनाचेहि परीक्षण करू शकतात. प्रश्नांची संख्या आशय व उताऱ्यानुसार साधारणत: 2-4 असावी.


दैनदिन पाठाच्या अद्यापनानंतर प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यात निर्माण करणे शिक्षणाचा प्रमुख उद्देश असतो. वाक्प्रचार व म्हणीचा वाक्यात उपयोग करणे, गाळलेले शब्द भरणे, योग्य जोड्या जुळविणे, पाठाचा संक्षिप्त सारांश सांगणे, भूमिका अभिनय करणे, नाट्यीकरण करणे, काव्यवाचन करणे,

उताऱ्याचे भाववाचन करणे इ. द्वारे उपयोजन करता येते. अलंकार, वृत्ते इ. व्याकरण अध्ययनाकरिता उपयोजन उपयुक्त ठरते. 


5) गृहपाठ :


दैनदिन पाठाच्या शेवटची पायरी गृहपाठ होय. दृष्टी विकास, स्वयं अध्ययन इ. गृहपाठाचा उद्देश असतो. एखादा पाठ्यांश शिकविल्यानंतर पाठ्यांशासी संबंधित विचारापेक्षा अन्य विचारला दिशा देणारे प्रश्न विचारावे. विद्यार्थ्याची ज्ञानलालसा वाढीस लागेल असा गृहपाठ द्यावा. गृहपाठात वैविध्य राहील याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी. तुकारामाच्या अभंगाच्या अभ्यासानंतर अन्य संताच्या कविता अभ्यासास सांगणे हा सुद्धा गृहपाठ होऊ शकतो. शिक्षकांनी गृहपाठ देतांना रुक्षपणा व यांत्रिकता टाळावी.


दैनंदिन अध्यापनाकरिता हर्बार्टने वरील पंचपदी सांगितलेली आहे. पाठ्यांशाला अनुसरून पंचपदिमध्ये फेरबदल करता येईल. अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया असल्याने यांत्रिकता व कृत्रिमता टाळावी.