कथाकथन - Storytelling Method

कथाकथन - Storytelling Method


कथाकथन ही ज्ञान प्राप्तीची प्राचीन पद्धती आहे. आजी आजोबा आपल्या नातवंडांना परींच्या कथा, महापुरुषांच्या कथा, पौराणिक कथा, साहस कथा सांगत असत. कथाकथनातून हास्यनिर्मिती, बोधनिर्मिती, मूल्यनिर्मिती, संस्कारनिर्मिती घडून येत असे. लहान मुलांना कथांची फार ओढ असते. ते वारंवार कथा सांगण्याचा आग्रह धरतात. बालकांचे अवधान प्रदीर्घ काळ टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेमध्ये असते. 


कथाकथन पद्धतीचा अर्थ :


“एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पाठातील मध्यवर्ती कल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी शिक्षक आपल्या विवेचनाला जेंव्हा कथेची जोड देतो, तेंव्हा त्या पद्धतीला कथाकथन पद्धती असे म्हणतात."


कथाकथन पद्धती :


शिक्षकाचे कथाकथन रसाळ होण्याकरिता कथांचा संग्रह शिक्षकाजवळ असणे अत्यंत आवश्यक असते. परींच्या कथा, महापुरुषांच्या कथा, पौराणिक कथा, साहस कथा अशा विविध कथा शिक्षकाला मुखोद्गत असाव्या लागतात. कथाकथनाकरिता शिक्षकाने कथा वाचन न करता कथा कथन करावी. शिक्षकाने कथा प्रथम समजून घ्यावी व नंतर विद्यार्थ्यांना सांगावी. कथेतील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, प्रसंग, गर्भार्थ याचे विस्मरण होऊ नये. कथेतून विद्यार्थ्यांवर मूल्य संस्कार व्हावेत. कथानकाची भाषा सोपी, सरळ, ओघवती, रसाळ, रंजक, विनोदप्रचुर, लक्षवेधक असावी. कथाकथनातून हास्यनिर्मिती, बोधनिर्मिती, मूल्यनिर्मिती, संस्कारनिर्मिती व्हावी. शिक्षकाने प्रसंगी विद्यार्थ्यालाही कथा कथनाची संधी द्यावी. रोचक पद्धतीने प्रसंगाचे सुरेख चित्रण कथाकथनातून करावे. प्रामुख्याने व्यक्ती वैशिष्ट्ये चित्रित करण्याचा कथाकथनाचा उद्देश्य असतो.