पर्यवेक्षित अभ्यास - Supervised Study
पर्यवेक्षित अभ्यास - Supervised Study
अभ्यास कसा करावा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. अभ्यासाची निश्चित व योग्य पद्धत अवगत नसते. अभ्यासाचे योग्य तंत्र माहिती नसल्याने असंख्य विद्यार्थी परीक्षेत अयशस्वी होतात. सतत अनुत्तीर्ण झाल्याने असंख्य विद्यार्थी शिक्षण सोडून देतात. स्वःत अभ्यास करून यश प्राप्तीचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना नसतो. स्वयं अभ्यासाचे तंत्र अवगत नसल्याने आवश्यकता नसतांनाही शिकवणी वर्ग लावून पैसा व वेळेचा अपव्यय करतात. टिपणे काढणे, मुकवाचन करणे, वाचलेले लक्षात ठेवणे, समजून घेणे, स्मरणात ठेवणे इत्यादी गोष्टी निट करता येत नाही. आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यासाचे वातावरण, पाठ्यपुस्तके, ग्रंथ, संदर्भ पुस्तके, शब्दकोश, लेखन साहित्य उपलब्ध नसते. परिणामी विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात. अध्ययनाचे तंत्र अवगत करून योग्य मार्गाने अध्ययन करण्यासाठी पर्यवेक्षित अभ्यास तंत्राची आवश्यकता भासते.
पर्यवेक्षित अभ्यास तंत्राचा अर्थ :
“विद्यार्थी स्वत: अभ्यास करीत असतांना अध्ययन प्रक्रियेत त्याला उत्तेजन देणे आणि मार्गदर्शन करून त्याला स्वावलंबी व कार्यक्षम बनविण्याचे जे कार्य शिक्षक उपस्थित राहून करीत असतात. त्या कार्यास पर्यवेक्षित अध्ययन असे म्हणतात."
पर्यवेक्षित अभ्यास तंत्र
पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आणि शिक्षकांच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांकडून केला जाणारा अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास होय. पर्यवेक्षित अभ्यास वर्गात, ग्रंथालयात वसतिगृहात करता येतो. पर्यवेक्षित अभ्यासाच्या यशस्वीतेकारिता विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक व सक्रीय सहभाग आवश्यक असतो. पाठ्यघटकाची माहिती घेणे व उजळणी करणे हा या तंत्राचा उद्देश्य असतो. पर्यवेक्षित अभ्यास तंत्राकरिता पाठ्यपुस्तक, ग्रंथ, संदर्भ पुस्तके, कोश, नकाशे, तक्ते इत्यादी साधने व मार्गदर्शक शिक्षकाची आवश्यकता असते. या तंत्राच्या यशस्वितेकरिता मार्गदर्शक शिक्षकाची भूमिका व जबाबदारी महत्त्वपूर्ण असते.
वार्तालाप में शामिल हों