लेखनाचे प्रकार - Types of writing

लेखनाचे प्रकार - Types of writing


लेखनाचे प्रकार पुढिलप्रमाणे सांगता येते.


1) अक्षर शब्द वाक्यलेखन :


लेखनाची सुरूवात मुळाक्षर लेखनापासून होते. मुळाक्षरानंतर जोडाक्षरे, शब्द यांचे लेखन केले जाते. त्यानंतर वाक्यलेखन केले जाते. वाक्यलेखन ही इतर लेखन प्रकाराची पहिली पायरी आहे. प्रत्येक भाषेत वाक्यरचनेची एक विशिष्ट पद्धती असते. वाक्यरचनेचे विविध प्रकार असतात.


2) परिच्छेद लेखन :


परिच्छेद लेखन म्हणजे एकच एक विचार व्यक्त करणारा अनेक वाक्यांचा सुसंगत समूह होय. परिच्छेदात एक प्रमुख विचार, कल्पना किंवा भावना व्यक्त केलेली असते.

त्याला आपण आशय म्हणतो. या आशयाचा विस्तार अनेक वाक्यांद्वारे केलेला असतो. या वाक्यांचा परस्परांशी संबंध असतो. त्यामुळे प्रत्येक वाक्यात एकसंगती असते. परिच्छेदलेखन हे निबंध, पत्रलेखन, कथालेखन इत्यादी लेखन प्रकाराचे एक अंग असते.


3) सारांश लेखन / सार लेखन:


मूळ उताऱ्यातील आशय समजून स्वतःच्या मोजक्या शब्दात लिहिणे म्हणजे सारांश लेखन होय. सारांश लेखन मूळ उता यापेक्षा लहान असते. ते मूळ उताऱ्यांच्या /ते /, इतके असते. सारांश लेखन मूळ लेखकाची पुनरावृत्ती न करता स्वतःच्या शब्दात, भाषेत असते.


सारांश लेखन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतनाला दिशा मिळून वाचलेला आशय स्वत:च्या शब्दात मांडण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण होते.


4) निबंध लेखन :


'नि + बंध' म्हणजे सुव्यस्थित बांधणे होय. ही बांधणी विचारांची, कल्पनांची असते. निबंधातील आशयाची तर्कशुद्ध मांडणी केलेली असते. ती मांडणी अनेक परिच्छेदांतून केलेली असते. या प्रत्येक परिच्छेदात एक संगती असते. निबंधाचे शीर्षक आशयाला अनुसरून असते. निबंधाचे खालील प्रकार आहेत. वैचारिक निबंध - उदा. समाजातील स्त्रीचे स्थान, वर्णनात्मक निबंध - पावसाळ्यातील एक दिवस, कल्पनात्मक निबंध - मी मुख्यमंत्री झालो तर, आत्मकथनपर निबंध पुस्तकाचे आत्मवृत्त, चरित्रात्मक निबंध - माझा आवडता नेता.


5) कल्पनाविस्तार-लेखन :


कधी कधी एखादे मार्मिक वाक्य वाचून मनावर मोठा परिणाम होतो. ते सुभाषित असेल, काव्यपंक्ती असेल किंवा म्हण असेल उदा. केल्याने होत आहे रे अति तिथं माती या मार्मिक वाक्याचे स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या भाषेत व स्वतः च्या कल्पनेने केलेले स्पष्टीकरण म्हणजे कल्पनाविस्तार लेखन होय.


6 ) पत्रलेखन :


प्रत्येक व्यक्ती चांगला लेखक बनेलच असे नाही. पण प्रत्येकाला पत्रलेखक बनावे लागते. अनेक कारणांसाठी आपल्याला पत्र लिहिणे गरजेचे असते. पत्रलेखनाचे घरगुती पत्र, व्यावसायिक पत्र, मागणीपत्र, अभिनंदनपर पत्र, विनंती पत्र इत्यादी प्रकार आहेत. पत्रलेखनाच्या (1) पत्ता व दिनांक (2) मायना/संबोधन (3) मजकूर / आशय (4) समारोप (5) पत्ता व स्वाक्षरी या पायऱ्या आहेत.


7) कथालेखन :


लहान-थोर सर्वांनाच कथा ऐकणे, वाचणे आवडते. कथालेखनाची या अंगे महत्त्वाची आहेत. 

(1) कथानक 

(2) पात्रे 

(3) कथनशैली. 


कथेत घटनेचे किंवा प्रसंगाचे वर्णन असते. हे वर्णन पात्रांच्या जीवनाशी निगडित असते. कथालेखनाच्या तांत्रिक बाजू खालीलप्रमाणे सांगता येतात. 


(1) कथेचे शीर्षक 


(2) मोजक्या घटना किंवा प्रसार 


(3) पात्रे व त्यांची स्वभाव वैशिष्टये 


(4) योग्य लेखन शैली 


(5) पात्रानुरूप भाषा व संवाद.


(6) कथानक. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चित्रावरून कथा लिहिणे, मुद्यावरून कथा लिहिणे इत्यादी कथालेखनाचे प्रकार शिकवले जातात.


8) संवाद लेखन :


दोन किंवा अधिक व्यक्तींच्या संभाषणाला संवाद म्हणतात. संवाद एखादया विशिष्ट विषयावर होत असतात. या संवादाचे लेखन करून त्याचा वापर कथा, कादंबरी, नाटक यात केला जातो. संवाद लेखन हे आशयानुसार असावे लागते. संवादातून पात्रांचे स्वभावचित्रण व्हावे लागते.


9) अहवाल लेखन :


एखादया कार्यक्रमाचा किंवा एखादया संस्थेचे इतिवृत्त लिहून लोकांसमोर मांडणे म्हणजे अहवाल लेखन होय. अहवाल लेखनात तारखा, सहभागी व्यक्ती, ठळक प्रसंग, निष्कर्ष इत्यादींचे मोजक्या शब्दात लेखन असते. शाळेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, उपक्रमांचे अहवाल लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेता येते. 


10) दैनंदिनी लेखन :


दैनंदिनी लेखन म्हणजे स्वत:शी हितगूज साधणे होय. आपल्याला येणारे अनुभव, आपले वागणे, इतरांचे आपल्याशी वागणे, स्वतःच्या चुकांची कबूली आपल्या इच्छा-आकांक्षा, मते, प्रतिक्रिया, स्वप्ने इत्यादींचे दैनंदिन लेखन केले जाते. लेखन अनौपचारिक व नैसर्गिक असते.


11) वार्तालेखन :


सामाजिकदृष्टया महत्त्वाच्या घडामोडी, सुरस घटना, प्रसंग इत्यादी वार्तालेखन केले जाते. वार्तालेखन हे वस्तुनिष्ठ व मोजक्या शब्दात असते.


12) काव्यलेखन :


हा सर्वात उच्च स्तरावरचा लेखन प्रकार आहे. लिहिणाऱ्याला शंभर पाने लिहूनही जे साध्यहोत नाही ते साध्य कवितेच्या एका ओळीतून होते. काव्यात भावनांचा कल्लोळ असतो, सुंदर शब्दरचना असते, मनाला मोह पाडणारी लय असते. काव्यलेखनासाठी एक उपजत शक्ती असावी लागते. काव्यलेखनात प्रभावी शब्द, वक्रोत रस, गेयता इत्यादी वैशिष्टये असतात. अनुभवांची व भावनांची रेलचेल असेल तर काव्य निर्माण होते.